इंद्रजीत थोरात यांनी केली नुकसानग्रस्त गावांची पाहणी
संगमनेर : तालुक्यातील पश्चिम भागातील पेमगिरी, निमगाव बुद्रुक, सांगवी, सावरचोळ, नांदुरी दुमाला या गावांमध्ये काल शनिवारी चार वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने व गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान झाले असून अनेक घरांची पडझड झाली आहे.पावसानंतर सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक इंद्रजीत थोरात यांनी तातडीने या भागाची पाहणी केली. दरम्यान गारपिट व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून मदत देण्याच्या सूचना काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केल्या आहेत.
काल शनिवारी चारच्या सुमारास तालुक्यातील नांदुरी दुमाला ,सांगवी, सावरचोळ, मेंगाळवाडी, निमगाव बुद्रुक,निमगाव खुर्द,पेमगिरी,शिरसगाव धुपे या गावांमध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतीचे मोठे नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची इंद्रजीत थोरात, सोमनाथ गोडसे, बाळासाहेब कानवडे, संजय कानवडे, मनीष गोपाळे, भास्कर गोपाळे, ॲड मिनानाथ शेळके, नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, कृषी सहाय्यक यांनी तातडीने पाहणी केली. चारच्या सुमारास पश्चिम भागातील विविध गावांमध्ये गारपिटीने मोठे नुकसान झाले. यामध्ये शेतीत उभे असलेले चारा पीक विशेषता मका, घास याचबरोबर झेंडू फुले,टोमॅटो यांसह विविध पिकांचे मोठे नुकसान झाले. तसेच वादळी वाऱ्याने घरांची पडझड झाली आहे. आणि घरांचे पत्रे उडाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे .या नुकसानीची इंद्रजीत थोरात यांनी तातडीने पाहणी करत या नुकसानीची माहिती काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांना दिली, त्यावर आमदार बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला तातडीने सर्व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना व नुकसानग्रस्तांना सर्वतोपरी जास्तीत जास्त मदत देण्याच्या सूचना केल्या आहेत.यावेळी बोलताना इंद्रजीत थोरात म्हणाले की,शेतकरी हा अनंत अडचणीत असून शेतमालाला भाव नाही. त्यातच अशा अवकाळी पावसाने हातात आलेल्या पिंकाचे पूर्ण नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. ही शेतकऱ्यांसाठी मोठी आपत्ती असून शासनाने फक्त घोषणा न करता तातडीने जास्तीत जास्त मदत या सर्व शेतकऱ्यांना केली पाहिजे. या शेतकऱ्यांच्या मदतीकरता आमदार बाळासाहेब थोरात हेही पाठपुरावा करणार असून शेतकऱ्यांना लवकर मदत मिळेल याकरता आपणही प्रयत्न करू असे सांगितले.यावेळी अनेक शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना इंद्रजीत थोरात यांनी दिलासा दिला.