संगमनेर पोलिसांनी दरोडेखोरांची टोळी पकडली ; चार अटकेत, एक जण पसार

0

 संगमनेर : पोलीस उपअधीक्षक आणि संगमनेर शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेली पुणे जिल्ह्यातील दरोडेखोरांची टोळी पकडली, मात्र या पाच जणांच्या टोळीतील एक दरोडेखोर मात्र अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी झाला असला तरी चार दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात या पथकाला यश आले आहे. पोलिसांच्या या दिलासादायक कामगिरीचे शहर आणि तालुक्यातून कौतुक होत आहे.

         संगमनेर तालुका, आश्वी, घारगाव आणि शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसापासून गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती, त्यामुळे शहराबरोबर तालुक्यातील जनतेत घबराटीचे वातावरण होते, मात्र काल शुक्रवार दि. १० मार्च रोजी पहाटे चार चाकी वाहनातून प्रवास करणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यास पोलीस उपाधीक्षक आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाला यश आले. पोलीस उपाधीक्षक संजय सातव आणि शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या आदेशान्वये दोन दिवसांपूर्वीच्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक फराहनाज पटेल तसेच पोलीस उपाधीक्षकांच्या पथकातील पोलीस कर्मचारी प्रमोद गाडेकर, अण्णासाहेब दातीर, शहर पोलीस ठाण्याचे वाहन चालक अजय आठरे, अमृत आढाव, सुभाष बोडखे,होमगार्ड थोरात यांचे पथक नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गावरून जात होते. त्यावेळी संगमनेर खुर्द गावच्या शिवारात सूर्या बार पासून काही अंतरावर पाठीमागून नंबर नसणारी स्विफ्ट कार संशयास्पद उभी असल्याची बाब या पथकाच्या निदर्शनास आली. त्यामुळे पोलिस कार जवळ गेले असता कारच्या बाहेर उभा असणारा एक जण पोलिसांना पाहून अंधाराचा फायदा घेत जवळच्या शेतात पळून गेला. मात्र कार मध्ये असलेले चार जण पोलिसांच्या तावडीत सापडले. यावेळी पोलिसांनी स्विफ्ट गाडीची तपासणी केली असता या गाडीत कुऱ्हाड, सतुर, चार करवती, कागदामध्ये बांधलेली मिरची पावडर, नायलॉन दोरी, लोखंडी गज, कानस असे दरोडा टाकण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य मिळून आले. पोलिसांनी दरोडेखोरांच्या ताब्यात असलेली स्विफ्ट कार नंबर  एम एच ०२ सी.डी ८१४८  हिच्यासह अडीच लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले. या पथकाने चार आरोपीकडे असलेले मोबाईल ताब्यात घेतले. पोलिसांनी या प्रकरणी महेंद्र लक्ष्मण मधे (वय २५), रा. अभंग वस्ती, नारायणगाव,ता. जुन्नर, जिल्हा पुणे,अविनाश चंद्रकांत जाधव (वय २६), प्रवीण चंद्रकांत जाधव (वय २४) दोघेही रा. शिरोली (बोरी), डावखर मळा, ता. जुन्नर, जिल्हा पुणे, रोहन रामदास गिऱ्हे (वय ३०) हल्ली रा. खोडद, ता. जुन्नर, जिल्हा पुणे, मुळगाव शिंदोडी ता. संगमनेर जिल्हा अहमदनगर यांना अटक केली असून सोन्या नावाचा त्यांचा पाचवा साथीदार पसार होण्यात यशस्वी झाला आहे. याबाबत पोलीस उपाधीक्षकांच्या पथकातील पोलीस कर्मचारी प्रमोद गाडेकर यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून वरील सर्व आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना काल शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here