संगमनेरात व्यापाऱ्याच्या बंगल्यावर सशस्त्र दरोडा ; 

0

रोख रकमेसह साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने घेऊन दरोडेखोर पसार संगमनेर  : चंद्रकांत शिंदे पाटील

संगमनेरातील प्रतिष्ठित व्यापारी केदारनाथ भंडारी यांच्या भर वस्तीत असणाऱ्या बंगल्यावर चार सशस्त्र दरोडेखोरांनी घरातील सदस्यांना मारहाण करत पिस्तूल, चाकू, कोयता याचा धाक दाखवत धुमाकूळ घातला, यावेळी दरोडेखोरांनी भंडारी यांच्या घरातील दोन लाख ६०  हजार रुपयांची रोकड, साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने आणि एक मोबाईल घेऊन पोबारा केला. दरम्यान शहरात चोरीच्या घटनेत वाढ झाल्याने संगमनेरकर हादरले आहेत.

           नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गा लगत सह्याद्री विद्यालया नजीक भर वस्तीत शहरातील प्रतिष्ठित व्यापारी केदारनाथ भंडारी यांचे वास्तू वैभव हे दुकान तसेच भंडारी ऑइल मिल आहे आणि लगतच त्यांचा बंगला आहे. या बंगल्यात गुरुवार दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी ७:४५ वाजेच्या सुमारास सशस्त्र चार दरोडेखोरांनी प्रवेश केला. या दरोडेखोरांच्या हातात पिस्तूल, चाकू, कोयता अशी हत्यारे होती, या हत्यारांचा धाक दाखवत दरोडेखोरांनी घरात असणाऱ्या केदारनाथ भंडारी यांच्या पत्नी शोभना भंडारी, मुलगा पार्थ आणि त्याचा मित्र प्रणव या तिघांना मारहाण करत धमकावले. शोभना भंडारी यांनी दरोडेखोरांना तुम्हाला काय न्यायचे ते न्या, मात्र मारहाण करू नका अशी विनवणी केली, त्यावर दरोडेखोरांनी त्यांना कपाट उघडण्यास सांगून कपाटातील दोन लाख ६० हजाराची रोकड आणि साडेनऊ तोळे सोन्याचे दागिने तसेच विवो कंपनीचा एक मोबाईल घेऊन दरोडेखोरांनी तेथून पळ काढला. दरोडेखोर भंडारी यांच्या बंगल्यात धुमाकूळ घालत असताना याची पुसटशी कल्पना देखील आसपासच्या कोणाला ही लागली नाही. हे दरोडेखोर कसे आले हे सुद्धा भंडारी कुटुंबीयांना समजले नाही. केवळ ७:४५ वाजेच्या सुमारास हा सशस्त्र दरोडा पडल्याने संगमनेरकरात दहशत निर्माण झाली आहे.  याबाबत शोभना केदारनाथ भंडारी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निवांत जाधव करत आहेत़. भंडारी यांच्या बंगल्यावरील दरोड्याच्या घटनेच्या एक दिवस अगोदर बुधवारी पहाटे सशस्त्र चोरट्यांनी उपनगरातील गोल्डन सिटी परिसरात धुमाकूळ घालत सुजाता रहाणे यांच्या बंद बंगल्यात प्रवेश करत चाळीस हजार रुपये किंमतीचे सव्वा तोळेे वजनाचे सोन्याचेे दागिने व आठ हजार रुपयेे रोकड घेऊन पलायन केले होते. सदरचे चोरटे हे तेथील सीसीटीव्हीत सुद्धा कैद झालेले आहेत़. या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी केदारनाथ भंडारी यांच्या भर वस्तीत व वर्दळीच्या ठिकाणी असणाऱ्या बंगल्यावर सायंकाळी ७:४५ वाजेच्या सुमारास दरोडा पडल्याने आश्चर्य व्यक्त केेले जात आहे.  त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा वचकच राहिला नसल्याचे वारंवार घडणाऱ्या या घटनांवरून सिद्ध होत आहे.

शहर व तालुक्यात चोरीच्या घटनेत लक्षणीय वाढ झाल्याने व याचा तपास लागत नसल्याने पोलिस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर जनतेतून संताप व्यक्त होऊ लागला आहे. गत महिनाभरापूर्वी शहरालगतच्या सुकेवाडी आणि पावबाकी परिसरात सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने वृद्धध महिलेला मारहाण करत व धुमाकूळ घालत मोठा ऐवज लुटून नेला होता. त्यानंतर दरोडेखोरांनी आता संगमनेर शहर आणि शहरातील उपनगराकडे आपले लक्ष केंद्रित केल्याचे घडत असलेल्या या घटनांवरून समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here