संत कवी महिपती महाराज श्रीक्षेत्र ताहाराबाद ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :

                शेकडो वर्षांची वारीची परंपरा असलेल्या व महाराष्ट्राचे प्रती पंढरपूर समजल्या जाणाऱ्या राहुरी तालुक्यातील श्री संत कवी महिपती महाराज पायी दिंडी सोहळ्याचे सालाबादप्रमाणे यंदाही श्रीक्षेत्र ताहाराबाद ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे आषाढी वारीसाठी वै.धनाजीबाबा गागरे मांडवेकर यांच्या प्रेरणेने तसेच नाना महाराज गागरे, बाळकृष्ण महाराज कांबळे व बाबासाहेब महाराज वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि.१५ जून रोजी सकाळी १०वा. प्रस्थान होणार आहे.

       यावेळी महिपती महाराजांच्या मंदिर प्रांगणात सोहळ्याचे पहिले रिंगण होऊन संत महिपती महाराजांच्या समाधी वृंदावनास पांढऱ्या शुभ्र अश्वाचे वंदन होऊन हा सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, हा सोहळा पांडुरंगाच्या भेटीला जात नसून पांडुरंगाकडे ‘मूळ’म्हणून जात आहे.

            श्रीक्षेत्र ताहाराबाद येथून श्रीक्षेत्र पंढरपूर वारीला श्री संत कवी महिपती महाराज यांचे वडील विठ्ठलपंत यांनी सुरुवात केली. त्यांच्यानंतर महिपती महाराजांनी परंपरा सुरू ठेवली. महाराजांनंतर त्यांच्या वंशजांनी वारी सुरू ठेवली. त्यांच्यानंतर वै.धनाजीबाबा गागरे मांडवेकर, त्यानंतर वै.प्रभाकरअण्णा कांबळे, माणिकबाबा व नाना महाराज कांबळे आदींनी ही वारी सुरू ठेवली. आता श्री संत कवी महिपती महाराज देवस्थानच्यावतीने नाना महाराज गागरे व बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्या अधिपत्याखाली वारी सुरू ठेवण्यात आली आहे. महिपतींच्या पायी दिंडी सोहळ्यात सुमारे २ हजार भाविकांचा समावेश असतो. पंढरपूर येथे महिपती महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्याला मानाचे स्थान आहे. जिल्ह्यातील नामवंत कीर्तनकार दिंडी सोहळ्यात सहभागी होतात.

        सन १९८६ साली देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली. त्यानंतर या परिसराचा विकास झाला व दिंडीची व्याप्ती वाढत जाऊन आज जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी व प्रमुख दिंडी झाली आहे. संत महिपती महाराजांनी पांडुरंगाला ताहाराबाद भेटीचे पत्र लिहिले होते. त्या पत्राला प्रत्यक्ष पांडुरंगाने उत्तर पाठवून ताहाराबादला येण्याचे मान्य केले होते. त्याप्रमाणे दरवर्षी वारकऱ्यांचा पालखी सोहळा पांडुरंगाला आणण्यासाठी जातो. त्यानंतर आषाढ वद्य नवमीला दिंडी पांडुरंगाला घेऊन ताहाराबाद क्षेत्री येते. त्याची प्रचिती म्हणून आषाढ अमावस्येला ‘पाऊलघडी’चा कार्यक्रम होतो. यामध्ये भगवान परमात्मा पांडुरंग जाताना आपल्या पाऊलखुणा सोडून जातात. हा कार्यक्रम पाहण्यासाठी वारकऱ्यांची प्रचंड गर्दी असते. नवमीपासून ते अमावस्या पर्यंत देवस्थानच्यावतीने उत्सव सुरू असतो.

     अशी ऐतिहासिक परंपरा असलेल्या दिंडीचे दि.१५ जून रोजी सकाळी १० वाजता प्रस्थान होत आहे. दिंडी सोहळ्या दरम्यान सकाळी ५ते६काकडा भजन, सकाळी ६ वा. प्रवास सुरू व अखंड भजन, दुपारी १२ वा. प्रवचन किंवा किर्तन. नंतर भोजन, विश्रांती व प्रवास, सायंकाळी ५ ते ६ वाजता हरिपाठ, आरती व नंतर भोजन, रात्री ८ वा. किर्तन असे दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

        पायी दिंडी सोहळा मल्हारवाडी, बारागाव नांदूर, राहुरी, देहरे, नगर, रुईछत्तीशी, मिरजगाव, चापडगाव, करमाळा, आदिनाथ सहकारी साखर कारखाना, टेंभुर्णी, संगम, लवंग, कुरोली मार्गे पंढरपूर असा प्रवास होणार आहे. पंढरपूर येथे देवस्थानच्यावतीने बांधण्यात आलेल्या श्री संत कवी महिपती महाराज मठात, लिंकरोड, पंढरपूर महाविद्यालयासमोर येथे दिंडीचे वास्तव्य राहणार आहे. 

डॉ. तनपुरे कारखान्याने अर्पण केलेला सर्वात मोठा रथ ह्या दिंडी सोहळ्यात सहभागी होणार असून या रथाचे मोठे आकर्षण राहणार आहे. शुक्रवार दि.१६जून रोजी सकाळी ९ वाजता राहुरी शहरात ताहाराबाद येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांची पावली व रथाची सवाद्य मिरवणूक होणार आहे.मा. राज्यमंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात येणार आहे.

    दिंडीसाठी राहुरी तालुका तसेच इतर तालुक्यांतून भाविंक मदत करीत असतात. या दिंडी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, उपाध्यक्ष अविनाश कांबळे, ज्येष्ठ विश्वस्त आसाराम ढूस, सुरसिंग पवार, मच्छिंद्र कोहकडे, शिवाजी बंगाळ, शिवाजी कोळसे, अशोक देशमुख, दत्तात्रय जगताप, रमेश नालकर, श्रीकृष्ण कांबळे, बापू गागरे, ॲड. अशोक किनकर, बाळासाहेब मुसमाडे, सुभाष पाटील, राजेंद्र वराळे, सुरेश बानकर, सचिव बाळासाहेब मुसमाडे, चोपदार मुकुंद (राजू) चव्हाण, कांता कदम तसेच पायी दिंडी सोहळा समिती आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here