संगमनेर : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा नाशिक पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांच्यावर अखेर काल काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई करत त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित केले आहे. गत आठ दिवसापासून सत्यजित तांबेच्या अपक्ष उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात रणकंदन सुरू आहे, त्याचा परिणाम त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित केले असल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत केली.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केलेले सत्यजित तांबे यांचे वडील आमदार डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेस पक्षाने चौथ्यांदा नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. मात्र आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी पक्षाचा एबी फॉर्म असताना देखील आपली उमेदवारी ऐनवेळी दाखल केली नाही. तसेच चिरंजीव सत्यजित तांबे यांची अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यामुळे काँग्रेस पक्षाची राज्यात मोठी नाचक्की झाली. त्याचा परिणाम आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेस पक्षाच्या शिस्तभंग समितीने घडलेल्या सर्व प्रकाराची चौकशी पूर्ण होईपर्यंत काँग्रेस पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यांच्या कारवाईला चार दिवस होत नाही तोच नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्यावर काल गुरुवारी काँग्रेस पक्षाने कारवाई करत त्यांना सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित केले असून नाशिक पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीने अपक्षच असणाऱ्या शुभांगी पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षानेच सत्यजित तांबे यांच्यासाठी भाजपाचे दरवाजे खुले करून दिले आहे. त्यामुळे आता भाजपा सत्यजित तांबेना पाठिंबा देते की सत्यजित तांबे भाजपात प्रवेश करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान सत्यजित तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात प्रचारात मोठी आघाडी घेतली आहे त्यांचा विजय निश्चित मानला जात असताना पक्षाने त्यांच्यावर कारवाई केल्याने ते आता काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.