देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी शहरामधील शासकीय जमिनीवरील तसेच इनाम जमिनीवरील रहिवास असलेले सर्वसामान्य नागरिकांचे अतिक्रमण नियमित करून त्यांना मालकी हक्काचा सातबारा उपलब्ध करावा याबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते निलेश जगधने यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की राहुरी शहरांमध्ये लक्ष्मीनगर, डावखर खळवाडी, मुलनमाथा, एकलव्य वसाहत, बुरुड गल्ली, तसेच इतर सर्व राहुरी शहरातील महाराष्ट्र शासन तसेच इनाम जमिनीवर गेल्या अनेक वर्षापासून सर्वसामान्य राहुरी शहरातील सर्व जातीय धर्मांची नागरिक या ठिकाणी वास्तव्य करून राहत आहेत परंतु महाराष्ट्र शासनाने वारंवार अतिक्रमण धारकांची रहिवासी अतिक्रमण नियमित करणे संदर्भात वेळोवेळी शासन निर्णय काढून देखील अद्याप पर्यंत राहुरी शहरात कोणत्याही प्रकारे या संदर्भात कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिक घरकुल योजना तसेच विविध योजने पासून वंचित राहिलेले आहेत. तसेच याबाबत मुख्यमंत्री यांनी विशेष दखल घेऊन राहुरी शहरातील शासकीय जमिनीवरील तसेच इनाम जमिनीवरील अतिक्रमण कायम करण्याबाबत आदेश देऊन यासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने उपविभागीय अधिकारी यांची समिती नेमून याबाबत योग्य कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. याबाबत अधिकारी जाणून बुजून टाळाटाळ करीत आहेत. त्या दोषी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी. राहुरी शहरातील सर्वसामान्य नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर जिल्हा नेते बाबासाहेब साठे, शहराध्यक्ष पिंटू नाना साळवे, वाय एस तनपुरे, भास्करराव आल्हाट, युवक शहराध्यक्ष महेश साळवे आदींच्या सह्या आहेत.