संगमनेर : अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा जन्मदिन हा संपूर्ण तालुक्यात प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. आधुनिकता, शिस्त,काटकसर व पारदर्शकता ही तत्वे सहकारात रुजवणारे स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांमुळे संगमनेरचे सहकार मॉडेल हे देशासाठी सदैव दिशादर्शक ठरणारे असल्याचे गौरवोद्गार काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेतील गटनेते व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काढले.
अमृत उद्योग समूहाच्या वतीने कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करण्यात आले यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी बाजीराव खेमनर, सौ.दुर्गाताई तांबे, सत्यजित तांबे, रणजीतसिंह देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, सुधाकर जोशी, संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचे सह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सहकार ध्वजवंदन करून मानवंदना ही देण्यात आली.
याप्रसंगी बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले की, स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यप्राप्तीनंतर गोरगरीब व सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी सहकाराचा मार्ग निवडला. आयुष्यभर सहकारात सेवावृत्तीने काम करताना त्यांनी पारदर्शकता, काटकसर, आधुनिकता, स्वच्छ कारभार ही आदर्श तत्वे रुजवली.या तत्त्वांमधून संगमनेरचा सहकार फुलला. काँग्रेसचे वरिष्ठ नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आज संगमनेरचा सहकार हा देशासाठी दिशादर्शक ठरला आहे. दुष्काळी तालुका ते प्रगतशील तालुका यामध्ये विविध संस्थांची उभारणी, रचनात्मक कार्य, गोरगरिबांच्या आर्थिक सामाजिक विकास हे महत्त्वाचे काम तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी केले. वयाच्या ८४ व्या वर्षी पर्यावरणाचे काम करताना त्यांनी दंडकारण्य अभियान राबवले. त्याचबरोबर सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून मोठे हॉस्पिटल सुरू केले. आज हे हॉस्पिटल उत्तर महाराष्ट्रातील अनेक गरजूंसाठी आरोग्य मंदिर ठरले आहे.अलौकिक कार्याचा पाया घालणाऱ्या भाऊसाहेब थोरात यांचे विचार हे कायम प्रेरणास्त्रोत राहिले आहे. त्यांच्याच विचारावर संगमनेर मधील सर्व कार्यकर्ते सदैव काम करत आहेत आणि हाच सेवाभावी विचार देशातील सहकारासाठी मार्गदर्शक ठरला असल्याचे ही ते म्हणाले.यावेळी ॲड.नानासाहेब शिंदे,संपतराव गोडगे, प्राचार्य केशवराव जाधव, प्रा.बाबा खरात, विलास कवडे, सुभाष सांगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ.सुजित खिलारी, सेक्रेटरी किरण कानवडे, अनिल थोरात यांच्यासह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले.
चौकट :- तालुक्यातील प्रत्येक गावात प्रेरणा दिन साजरा
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचा जन्मदिन १२ जानेवारी हा संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा होतो. विविध ठिकाणी निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, प्रभात फेरी, आदी उपक्रमांचे आयोजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. याचबरोबर सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने अमृतेश्वर मंदिर प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजनही करण्यात आले होते.