वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
राहुरी तालुक्यातील शाळेच्या सहलीत शिक्षकाने मुलीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे.
शालेय मुलींची छेड काढणाऱ्या एका शिक्षकाला गजाआड केल्याच्या घटनेला महिना उलटत नाही तोच घडलेल्या या दुसऱ्या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील शाळेची सहल मुंबई परिसरात गेली होती. या सहलीदरम्यान शिक्षकाने मुलींशी गैरवर्तन करण्याचा प्रकार केला. सहलीवरून घरी परतल्यानंतर मुलींनी घडलेला प्रकार पालकांना सांगितला बदनामीच्या भितीने पालकांनी पोलिसांत तक्रार देणे टाळत शाळा व्यवस्थापनाकडे शिक्षकाच्या बदलीची मागणी केली. मात्र त्याची दखल घेतली नाही, त्यामुळे पालकांनी हा प्रकार गट शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणुन दिला. त्यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत शिक्षकाचा जवाब नोंदविला जाईल. त्यात ते दोषी आढळले तर कारवाई केली जाईल, असे आश्वासन पालकांना देण्यात आले. चौकशीसाठी शनिवारी शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी शाळेत ठाण मांडून होते. संबंधित प्रकरणाबाबत लेखी जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
एका शाळेतील मुलींसह पालकांच्या तक्रारीची दखल घेतली आहे. प्रकरणात सत्य काय? याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. दोन ते तीन दिवसात योग्य ती कारवाई केली जाईल. शिक्षण क्षेत्रात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य राखण्यासाठी तालुका शिक्षण विभाग योग्य तो निर्णय घेईल.
गोरक्षनाथ नजन : गटशिक्षणाधिकारी, राहुरी.