सावित्रीबाई फुले मा. विद्यालयाच्या मुलींनी पटकावले विभागीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद !

0

देवळाली प्रवरा /प्रतिनिधी 

          राहुरी तालूक्यातील कृषी विद्यापीठ येथील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा १७ वर्षीय मुलींच्या संघाने शालेय विभागीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकाविले. या मुलींच्या संघाची राज्य शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

          नुकतेच कोकमठाण (ता. कोपरगाव) येथील आत्मा मलिक गुरुकुलच्या क्रिकेट मैदानावर सतरा वर्षीय मुलींची लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली. यामध्ये सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या मुलींनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्यांचा अंतिम सामना पुणे शहर संघाशी झाला. 

          पुणे संघाला नमवून सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकाविले. पहिल्या सामन्यात पुणे ग्रामीण तर दुसऱ्या सामन्यात सोलापूर ग्रामीण या संघांचा पराभव करत अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला होता. अतिशय चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी दणदणीत विजय मिळवला.

        या विजयी खेळाडूंचे राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रशांत पाटील यांनी अभिनंदन करुन पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सभापती डॉ. प्रमोद रसाळ, संस्थेचे सचिव डॉ. महानंद माने, खजिनदार घाडगे, मुख्याध्यापिका आशा धनवटे, उपमुख्याध्यापक अरुण तुपविहिरे, पर्यवेक्षक बाळासाहेब डोंगरे उपस्थित होते. 

         विद्यार्थिनींना क्रीडा शिक्षक व क्रिकेट प्रशिक्षक घनश्याम सानप, संतोष जाधव व तुकाराम जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी संघाचे सर्व शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here