सासऱ्याने विष पिऊन संपवले जीवन ..राहुरी तालुक्यातील घटना
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
सासऱ्याला रिटायर्ड मेंटचे मिळालेले पैसे आपल्या नावावर करावे तसेच १ एकर जमीन आपल्या नावावर करावी, या मागणीसाठी सुनेने आणि तिच्या नातेवाईकांनी खोटा गुन्हा दाखल करत दिलेल्या त्रासाला वैतागून नैराश्य आलेल्या सासऱ्याने विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचा दुर्दैवी प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे. याबाबत, मयत भाऊसाहेब ब्राम्हणे यांची पत्नी लताबाई ब्राम्हणे,रा. चिंचोलीफाटा,ता.राहुरी यांनी पोलिसाफिर्याद दिली आहे त्यात म्हटले आहे की, आपले पती हे ऐ.डी.सी.सी. बँकेत नोकरीला होते. २०१६ साली ते सेवानिवृत्त झाले. आपला मुलगा विशाल याचा विवाह १३ वर्षांपूर्वी चंद्रकांत ओहोळ, रा. फत्याबाद, ता. श्रीरामपूर यांची मुलगी वर्षा हिच्याबरोबर झाला. चार-पाच वर्षे नीट नांदल्यानंतर २०१६ ला पती हे रिटायर्ड झाल्यामुळे त्यांना
रिटायर्डमेंटचे पैसे मिळाले. तेव्हा पासुन सून वर्षा हिने माझ्या नावावर २० लाख रूपये टाका व १ एकर जमीन नावावर करून द्या, असा आग्रह करू लागली. तेव्हा माझ्या पतीने तिला समजावून सांगितले की,हे पैसे तुमचेच आहे,आता तुला कशाला लागतात ?जेव्हा कशाला लागतील तेव्हा आम्ही तुला देऊ, असे सांगितले व पैसे नावावर टाकले नाही. याचा राग आल्याने तिने घरात शिवीगाळ करत नंतर तिच्या वडीलांना आमच्या पुतण्याला घरी बोलावून घेतले व सदर पैसे आपल्या नावावर टाकण्यासाठी त्यांना आपल्या पतीला सांगायला लावले. त्यांनाही हे पैसे त्यांचेच आहे, गरज असेल तेव्हा देऊ असे सांगितले. परंतु, सून वर्षा हिने त्यानंतरही शिवीगाळ, दमदाटी घरात सुरूच ठेवली. सून, तिचे वडील,पुतण्या तसेच मामा यांनी त्रास देणे चालूच ठेवले.
या त्रासाला वैतागून मी व पती आम्ही दोघे राहुरी फॅक्टरी येथे रहायला आलो. दरम्यान, १२ नोव्हेंबर २०२४ ला सून वर्षा हिने वडील चंद्रकांत दादा ओहोळ, पुतण्या सुनिल ब्राम्हणे व तिचे मामा राजेंद्र दगडू भोसले यांच्या सांगण्यावरून आपल्याला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याचा खोटा गुन्हा सुनेने माझे पती भाऊसाहेब ब्राम्हणे यांच्यावर दाखल केला. या खोटया गुन्हयामुळे पती नैराश्यग्रस्त झाले होते. दि. ९ डिसेंबरला ते दुपारी २.३० ला राहुरी कारखाना येथे चौकात जाऊन येतो असे सांगत बाहेर पडले ते परत आलेच नाही. त्याबद्दल आपण मिसिंगची तक्रारही दाखल केली. दि. १३ डिसेंबरला सकाळी ९ ला घोरपडवाडी शिवारात भाऊसाहेब ब्राम्हणे यांचा मृतदेह आढळून आला. शवविच्छेदनात विषारी औषध घेवून आत्महत्या केल्याचे आढळून आले. त्यांच्या खिशात आढळलेल्या
चिठ्ठीवरून सून वर्षा विशाल ब्राम्हणे, व्याही चंद्रकांतदादा ओहोळ, पुतण्या सुनिल एकनाथ ब्राम्हणे, मामा राजेंद्र दगडू भोसले, रा. श्रीरामपूर यांनी दिलेल्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केल्याचा मजकूर या चिठ्ठीत असल्याचे फिर्यादीत म्हटले असून सदर फिर्यादीवरून सून, व्याही, पुतण्या आणि मामा यांच्याविरूद्ध राहुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोनि. ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस करीत आहेत.