पोहेगांव (वार्ताहर) : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी चांदेकरसारे पोहेगाव परिसरात शेतकऱ्यांनी चालू वर्षी उन्हाळी बाजरी पिकाला पसंती दिली आहे. या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उन्हाळी बाजरीचे पीक घेतले असून सध्या ही पिके सोंगणीला आले आहेत .सोनेवाडी परिसरात गोवर्धन प्रभाकर जावळे व पुरुषोत्तम प्रभाकर जावळे या बंधूंनी आपल्या शेतात तीन एकर बाजरीचे पीक घेतले आहे.
सुरुवातीला पहिलेच वर्ष असल्याने शेतात हे बाजरीचे पीक येते की नाही याची शाश्वती नव्हती. मात्र नाशिक जिल्ह्यातील त्यांच्या आजोळातील नातेवाईकांनी त्यांना हे पीक घ्यायचे कसे याची माहिती दिली.पहिलाच प्रयोग असल्याने त्यांनी या पिकाकडे चांगल्या प्रकारे लक्ष दिले. आज रोजी त्यांच्या शेतात बाजरीचे पीक डोलत असून पंधरा दिवसांनी ते सोगणीला येणार असल्याचे गोवर्धन जावळे यांनी सांगितले.
बाजरीच्या धान्याबरोबर शेतकऱ्यांना आपल्या जनावरांसाठी या पिकाचा जास्तीत जास्त उन्हाळ्यात उपयोग होणार असल्याने सध्या तर या परिसरात बाजरीच्या पिकाला पसंती देताना शेतकरी दिसत आहे.