सोनेवाडी ते तुळजापूर पंढरपूर यात्रेचे आज प्रस्थान

0

पोहेगाव : कोपरगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र सोनेवाडी ते तुळजापूर पंढरपूर यात्रेचे आयोजन करण्यात आले असून आज रविवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी सकाळी सात वाजता या यात्रेचे प्रस्थान होणार आहे.

ग्रामदैवत हनुमान मंदिरासमोर नारळ वाढवून या यात्रेला सुरुवात होणार आहे. सालाबाद प्रमाणे गेल्या 40 वर्षापासून नवरात्र उत्सवामध्ये साडेतीन शक्तीपीठांपैकी देवीचे दर्शन घेण्यासाठी वर्षातून एकदा या यात्रेचं आयोजन केले जाते. या यात्रेत गेल्या 40 वर्षापासून धर्मा जावळे, सोमनाथ जावळे, संतूजी दहे, कांतीलाल जावळे,सी जी जगताप, विनायक चव्हाण, बाळासाहेब जावळे, लक्ष्मण जावळे, संजय सुपेकर नफा ना तोटा या तत्त्वावर निस्वार्थपणे नियोजन करतात. गावातील शेकडो भाविकांनी या यात्रेत सहभागी होऊन वेळोवेळी यात्रा पूर्ण केली आहे. सोनेवाडी येथून सकाळी प्रस्थान झाल्यानंतर शनिशिंगणापूर, मांदियाळी, श्री क्षेत्र मढी, मोहटादेवी, तुळजापूर व नंतर पंढरपूर असे या यात्रेच नियोजन आहे. यावेळी माहिती देताना धर्मा जावळे यांनी सांगितले की ही यात्रा 1980 पासून सुरू असून त्यावेळेस यांत्रिकीकरणाचा फारशी प्रगती नव्हती. आमच्या अगोदरच्या यात्रेकरूंनी पायी वारी, सायकल वारी तसेच मोटर सायकल वारी अशा पद्धतीने ही यात्रा केली होती. 2012 साली माता वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी सोनेवाडी येथील भाविकांनी औरंगाबाद ते दिल्ली व 2015 साली पुणे ते चेन्नई रामेश्वरम असा विमान प्रवास केला असल्याचेही त्यांनी सांगितले. यापुढेही ही वारी सुरू असणार असून अनेकांनी या वारीचा आदर्श घेऊन वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांसाठी यात्रेचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here