कोळपेवाडी वार्ताहर :- कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ. सुशिलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शुक्रवार (दि. ३१) मार्च रोजी महाविद्यालय अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाअंतर्गत संस्थेच्या सचिव सौ चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० अंमलबजावणी: बहुविद्याशाखीय शिक्षण’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.सौ. विजया गुरसळ यांनी दिली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य आणि व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ.पराग काळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थेचे विश्वस्त आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेसाठी कर्नाटक येथील डॉ.मल्लाप्पा कोंढनापूर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूगोल विभागाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ.गणेश चव्हाण व वाणिज्य शाखेतील कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. संतोष पगारे हे उपस्थित राहणार आहेत. या राष्ट्रीय कार्यशाळेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे अवाहन प्राचार्या डॉ.सौ विजया गुरसळ यांनी केले आहे. सदर कार्यशाळेचे कामकाज समन्वयक प्रा.विनोद मैंद, प्रा.पांडुरंग मोरे हे करत आहेत.