अहिल्यानगर :- कोळशासारख्या पारंपरिक ऊर्जा स्रोतांचे साठे मर्यादीत असल्याने भविष्यात ऊर्जेच्या शाश्वत पर्यायांकडे वळावे लागणार असून त्यादृष्टीने सौर ऊर्जेच्या वापराबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले.
ऊर्जा संवर्धन सप्ताहानिमित्ताने आयोजित जनजागृती रॅलीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, महावितरणचे प्रभारी अधीक्षक अभियंता लक्ष्मण काकडे, कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण, अतिरिक्त कार्यकारी अभियंता भाऊसाहेब कुमावत, स्वप्नील उल्हे, महाऊर्जाचे आ ठाणगे, इलेक्ट्रीक इंजिनिअरींग कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष उमेश रेखे, ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष अमित काळे आदी उपस्थित होते.
डांगे म्हणाले, सौर ऊर्जा हा शाश्वत ऊर्जेचा स्रोत आहे. जिल्ह्यात वर्षभर सुर्यप्रकाश उपलब्ध होत असल्याने सौर ऊर्जेचा चांगला उपयोग विद्युत निर्मितीसाठी करता येईल. नागरिकांमध्ये या संदर्भात जागरूकता निर्माण करण्यात यावी.
पाटील म्हणाले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सौर ऊर्जा निर्मितीस मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येत आहे. यासाठी आवश्यक जमीनदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे. शाश्वत ऊर्जेची उपलब्धता ही काळाची गरज आहे. शिवाय प्रदूषण नियंत्रणासाठीदेखील नैसर्गिक स्रोतापासून वीज निर्मिती करणे आवश्यक आहे. याबाबत महावितरणने जनजागृती घडवून आणावी, असे आवाहन त्यांनी केले.
शेळके यांनी प्रास्ताविकात रॅलीच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी पर्यावरणपूरक ऊर्जेचा वापर करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.
सावेडी नाका येथील महावितरणच्या कार्यालयापासून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. फुलारी पेट्रोलपंप, प्रेमदान चौक, श्रीराम चौक, पालिका चौक, कलानगर चौक, आकाशवणी, प्रोफेसर कॉलनीमार्गे महावितरणच्या मंडळ कार्यालयाजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला.