आपल्या पत्रातील भावना मनाभावाच्या माणसापर्यंत पोहचविण्याचे साधन ‘टपाल'(जागतिक टपाल कार्यालय दिन)

0

  ९ ऑक्टोबर हा पहिला जागतिक पोस्ट दिवस १९६९ मध्ये टोकियो, जपान येथे यूनिवर्सल पोस्टल यूनियन काँग्रेसमध्ये घोषित करण्यात आला. भारतीय शिष्टमंडळाचे सदस्य श्री आनंदमोहन नरुला यांनी हा प्रस्ताव सादर केला होता. तेव्हापासून टपाल सेवांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जगभरात जागतिक पोस्ट दिवस साजरा केला जातो. ‘इंडिया पोस्ट’ या ब्रॅंड नावाखाली व्यवहार करणारे टपाल विभाग ही भारतातली सरकारद्वारे संचालित अशी टपाल प्रणाली आहे, जी दळणवळण मंत्रालयाची एक उपकंपनी आहे. १ ऑक्टोबर १८५४ रोजी ब्रिटिश भारतात लॉर्ड डलहौजी ह्यांनी आधुनिक भारतीय टपाल सेवेचा पाया रचला. डलहौजी ह्यांनी एकसमान टपाल दर (सार्वत्रिक सेवा) लागू केलेत आणि ‘इंडिया पोस्ट ऑफिस अॅक्ट १८५४’ मंजूर करीत लॉर्ड विल्यम बेंटिक ह्यांच्या भारतात टपाल विभागाची स्थापना करण्याविषयीच्या १८३७ च्या कायद्यात दुरूस्ती केली.          

         

दरवर्षी ९ ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन किंवा ‘वल्ड पोस्ट डे’ हा दिवस जगभरातून साजरा केला जातो. इंटरनेटच्या काळात आजही लोकं टपालसेवेचा वापर करतात आणि त्यावरचा लोकांचा विश्वास कायम आहे. एका शहरातून दुसरीकडे टपाल पाठविण्याचं सर्वात सोपं आणि स्वस्त साधन आहे ते म्हणजे पोस्ट सेवा. फक्त देशातच नाही तर जगातील कोणत्याही देशात टपाल पाठविण्यासाठी या सेवेचा लाभ घेता येतो. टपाल दिवस साजरा करण्याचा हेतू एवढाच कि, टपाल सेवा आणि त्यातील विभागांविषयी लोकांना जागरुक करणे होय. स्मार्टफोनच्या जमान्यात पत्र कोण पाठवेल? हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात देखील आला असेल. मात्र आजही भारतातील काही ठिकाणी पत्र हेच एकमेकांशी संपर्क करण्याचं साधन आहे. ‘टपाल’ हा इतिहासाचा मौल्यवान ठेवा, काळ बदलला तरी आजही त्याचे महत्व कायम आहे. एक काळ असा होता, जेव्हा लोक दिवस-रात्र पत्रांची वाट पाहत असे. मात्र बदलत्या काळाबरोबरच आणि तंत्रज्ञानाबरोबर मोबाईल, सोशल मीडियामुळे क्षणात कोणाशीही संवाद साधता येतो. मात्र आजच्या युवा पिढीला पत्र, पोस्टकार्ड आणि ग्रिटिंगचे महत्त्व हवे तेवढे वाटत नाही. एकेकाळी लोकांसाठी पत्र म्हणजेच सर्वकाही होतं.

          युनिवर्सल पोस्टल युनियन (युपीयु) ची उभारणी करण्यासाठी ९ ऑक्टोबर १८७४ मध्ये स्विर्झलंडची राजधानी ‘बर्न’ येथे २२ देशांनी मिळून करारावर सही केली होती. या घटनेच्या स्मृतीत टोकियोत १९६९ मध्ये आयोजित केल्या गेलेल्या संमेलनात ९ ऑक्टोबरला जागतिक टपाल दिन म्हणून घोषित करण्यात आले. १ जुलै १८७६ ला भारत ‘युनिवर्सल पोस्टल युनियन’ चा सदस्य होणारा पहिला आशियाई देश ठरला. बदलत्या काळासोबत जगातील सर्व टपाल सेवांनी त्यांच्या कार्यप्रणालीमध्ये आवश्यक बदल केले आहेत. नवीन तंत्रज्ञानासह टपाल सेवांनी स्वत: ला अधिक जलद केले आहे. डाक, पार्सल, पत्र हे एक्सप्रेसने जाण्याची सेवा सुरु झाली. जवळपास २५ वर्षांपूर्वी या बदलावांना सुरुवात झाली आणि सर्वच स्तरावर तांत्रिक बदल करण्यात आले. आता ऑनलाईन पोस्टल देवाण- घेवाणीवरही लोकांचा विश्वास वाढला आहे. ‘युपीयु ने केलेल्या एका सर्वेमध्ये अशी माहिती समोर आली की जगभरातून आजच्या घडीला ६५ पेक्षा जास्त प्रकारच्या ई-पोस्टल सेवा उपलब्ध आहेत. सध्याच्या टपाल व्यवस्थेची सुरवात सतराव्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात झाली. १६८८ मध्ये मुंबई आणि मद्रास इथे कंपनी पोस्टची कार्यालये स्थापन झाली. मात्र त्याद्वारे केवळ कंपनीच्या टपालाचीच ने-आण होई. वॉरन हेस्टिंग्ज हा बंगाल प्रांताचा गव्हर्नर असताना त्याच्याकडे मुंबई आणि मद्रास इलाख्याच्या देखरेखीचे अधिकार होते. त्या काळात  १७७४ मध्ये टपालसेवा जनतेसाठी खुली करण्यात आली. पोस्टमास्टर जनरलची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आणि टपालसेवेसाठी पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकने टपालासोबत वापरायला सुरूवात झाली. सुरवातीच्या काळातील अडचणींवर मात करण्यासाठी सर्व प्रेसिडेन्सीं अंतर्गतची टपाल सेवा एकसूत्री असावी असा विचार पुढे आला. त्यातूनच पहिला भारतीय टपाल कायदा, १८३७ हा अस्तित्वात आला. त्यात पुढे बदल करून १८५४ चा टपाल कायदा अस्तित्वात आला. त्याद्वारे देशात टपाल सेवेचा एकाधिकार हा टपाल खात्याला देण्यात आला. २०११ पर्यंत त्यात बदल झालेला नाही. पैसे भरल्याचा पुरावा म्हणून धातूची टोकने मागे पडून, १ ऑक्टोबर १८५४  पासून चिकट पार्श्वभाग असलेली टपाल तिकिटे वापरात आली.

       

१९७७ मध्ये भारतानं जाल कूपर यांचं टपाल तिकीट प्रसिद्ध केलं होतं. याचं कारणंही तसंच होतं. जाल कूपर हे टपाल तिकीट या विषयातील जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मुंबईत पारशी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. इंडियाझ स्टॅम्प जर्नलचे संपादन केले होते. भारतातील पहिल्या तिकीट संपादक ब्यूरोचे ते संपादक होते. त्यांनी इम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली होती. याच विषयावर त्यांनी पुढे पुस्तकही लिहिलं. त्यांच्या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरुप दिलं. भारतीय टपाल तिकीटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करुन जागतिक पातळी गाठणाऱ्या कूपर यांचे योगदान प्रचंड महत्वाचं आहे, हे त्यांच्यावर काढलेल्या तिकीटांवरुन लक्षात येतं. भारतात २३ टपाल क्षेत्रात विभागले गेले आहेत, प्रत्येक क्षेत्र चीफ पोस्टमास्टर जनरल यांच्या अध्यक्षतेखाली आहे. संपूर्ण देशासाठी ‘डायरेक्टर जनरल ऑफ पोस्ट’ हे प्रमुख पद आहे. युनिव्हर्सल पोस्टल युनियनने कार्यक्षम अशा टपाल सेवेचा मार्ग खुला केला, जी पुढे १९४८ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाची एक प्रमुख संस्था बनली. भारत स्वतंत्र्य झाल्यापासून ते आजपर्यंत टपाल तिकीटांच्या स्वरुपात, आकारात, रचनेत विविध बदल झालेत. त्यांच्यातील या बदलांमुळे त्या-त्या काळाविषयी माहिती मिळते. टपाल खाते नेते, फुलं, प्राणी-पक्षी, एखादी घटना, रौप्य, सुवर्ण, अमृतमहोत्सवी, शतक, द्विशतक किंवा त्रिशतकनिमित्त तिकीटं काढतं. १९४७ ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी पोस्ट तिकीटात बदल करण्यात आला होता. त्या तिकीटावर तिरंग्याचे चित्र दिले होते, तर कधी इंदिरा गांधी, महात्मा गांधी, राजीव गांधी, सचिन तेंडुलकर यांच्या सारख्या थोर व्यक्तींच्या प्रतिमा टपाल तिकीटांवर विशेष काळात होत्या. यावरुन आपल्याला त्या काळात त्यावेळी घडलेल्या घटनांची माहिती मिळते. त्यामुळेच टपाल तिकीटे हा इतिहासाचा मौल्यवान ठेवा आहे.

     

    हिमाचल प्रदेशमधील हिक्किम नावाच्या गावामध्ये जगातील सर्वात उंचावरील टपाल कार्यालय अर्थात पोस्ट ऑफिस आहे. ४४४० मीटर उंची जेथे श्वास घेण्यास अडचण येते, अशा ठिकाणी १९८३ पासून हे टपाल कार्यालय दुर्गम भागात पत्र पाठवण्याचे काम करते. हिक्किमच्या आजुबाजूच्या गावांचे संचाराचे एकमात्र साधन हे पत्र आहे. या टपाल कार्यालय हिक्किमबरोबरच लांगचा-१, लांगचा-२ आणि कॉमिक गावांमध्ये पत्र पोहचवण्याचे काम करते. बर्फामुळे जून ते ऑक्टोबरच्या काळात या ठिकाणी जाणे शक्य नसते. या टपाल कार्यालयात १९८३ पासून रिनचेन नावाची व्यक्ती पोस्टमनचे काम करत आहे. अनेकदा बर्फामुळे त्यांना घरी परतण्यास अडचणीचा सामना देखील करावा लागतो. तत्परतेने सेवा देणाऱ्या भारतीय टपाल विभागातील सर्वांना ‘आंतरराष्ट्रीय टपाल दिना’ निमित्त मनपूर्वक शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here