कारगिल युद्धात शहीद झालेल्यांना मानवंदना

0

कारगिल शहर जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून 205 किमी अंतरावर भारत-पाक आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. हिमालयाच्या इतर भागाप्रमाणे, कारगिलमध्ये थंड वातावरण असते. उन्हाळा हा सौम्य तर हिवाळा अतिशय दीर्घ व कडक असतो व बऱ्याचदा तापमान -40 डिग्री पर्यंत उतरू शकते. हे माहित असतांना देखील भारतीय सैन्यांनी पिछेहाट घेतली नाही. एवढया कडाक्याच्या थंडीत ते युद्धाला सामोरे गेले. त्यांच्या पराक्रमाची दाद द्यावी लागेल. राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगिल वसलेले आहे. कारगिलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता हे होय. घुसखोरांनी पाकव्याप्त काश्मीरच्या जवळच्या आणि रस्त्याला समांतर अशा 160 किलोमीटरच्या पट्यातच साधारणपणे घुसखोरी केली. लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. त्यातील काही चौक्या समुद्रसपाटीपासून 5000 मीटरपेक्षा अधिक उंचावर आहेत. नुसतेच कारगिल नव्हे तर आग्नेयेकडील द्रास व नैर्ऋत्येकडील मश्को खोऱ्यातील, तसेच बटालिक विभागातील चौक्यांवरही घुसखोरी झाली. कारगिल, द्रास व मस्को खोऱ्यातील चौक्या ह्या अति उंचीवर आहेत. अतिउंचावरील चौक्यांवर कडक हिवाळ्याच्या महिन्यांत सैन्य तैनात करून ठेवणे अतिशय अवघड असल्याने, हिवाळ्यापूर्वी दोन्ही बाजूने सैन्याची माघार व्हावी आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर व हवामान मानवी रहाण्यास स्थिर झाल्यानंतर, ते ते सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतावे, असा अलिखित समझौता भारत-पाकिस्तानमध्ये, कारगिल युद्धाच्या आधी पर्यंत होता. मात्र 1999 साली भारतीय सैन्य भारतीय चौक्यांवर परतण्यापूर्वीच पाकिस्तानी घुसखोरांनी ऐन हिवाळ्यात चौक्यांचा ताबा घेतला. त्यामुळे, कारगिलचे युद्ध भडकण्यास ठिणगी पडली.

         

श्रीनगर ते लेह दरम्यान धावणारा राष्ट्रीय महामार्ग 1 डी कारगिल मधून जातो. कारगिलला उर्वरित भारतासोबत जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. कारगिल विमानतळ सध्या भारतीय हवाई दलाच्या ताब्यात असून येथे नागरी विमानसेवा चालू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 1999 साली पाकिस्तानी लष्कराने घुसखोरी करून कारगिल भागावर अतिक्रमण केले होते. त्यामुळे झालेल्या कारगिल युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तान येथून हुसकावून लावले व कारगिल पुन्हा भारताच्या नियंत्रणाखाली आणले. हे युद्ध एकूण 60 दिवस चालले. युद्धात 30,000 भारतीय सैनिकांनी लढाई केली. 557 सैनिक मृत्युमुखी पडले, तर 1363 जखमी झाले. कारगिल युद्धात भारताच्या बोफोर्ससहित 300 तोफांचा वापर झाला. एकट्या टायगर हिलवर ताबा मिळविण्यासाठी 9000 तोफगोळ्यांचा मारा झाला. मीडियम रेंजच्या ज्या बोफोर्सच्या तोफांचे आयुष्य 40 वर्षे असल्याचे सांगितले जात होते, त्या तोफांपैकी 18 तोफा 25 दिवसात निकामी झाल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच एवढ्या प्रमाणात एकाचवेळी एवढे फायरिंग झाले. कॅप्टन बत्राने 7 जुलै 1999 रोजी कारगिल जवळचे जे शिखर काबीज केले त्याला हल्ली बत्रा टॉप म्हणतात. हिवाळ्यात कारगिल आणि आसपासच्या प्रदेशातील चौक्यांतून आपआपले सैन्य मागे घेण्याचा उभयमान्य रिवाज होता, तो पाकिस्तानने मोडला. त्यामुळे पुन्हा कारगिलसारखे युद्ध होऊ नये म्हणून तेथे हल्ली हिवाळ्यातही भारतीय सैन्य तैनात असते. भूभागाच्या सतत निरीक्षणासाठी टेहळणी पथकांमध्ये दहा पटीने वाढ करण्यात आली.

         1999 च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्‍नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले. हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्‍कृष्ट उदाहरण आहे. यात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळाला. हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज झाल्यानंतर पहिलेच युद्ध होते त्यामुळे सर्व जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले होते. परंतु भारताने हे युद्ध कारगिल पुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले. म्हणूनच, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला व याउलट, सैन्य मागे घ्यावे यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणला. या युद्धानंतर भारताने आपल्या संरक्षण खर्चात अनेक पटीने वाढ केली. तर पाकिस्तानात राजकीय अस्थिरता माजली. परिणामी, काही महिन्यांतच म्हणजे ऑक्टोबर, 1999 मध्ये पाकिस्तानात जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथून लष्करशाही लागू केली. कारगिल युद्ध भारताने जिंकले.

         

  पाकिस्तानने नेहमीच या बाबतीत आपला सहभाग असल्याचा इन्कार केला. कारगिलच्या युद्धात देखील पाकिस्तानने हीच खेळी वापरली व घुसखोर हे काश्मिरी स्वातंत्र्यसैनिक आहेत असे जगाला सांगण्याचा प्रयत्‍न केला. 1998 मध्ये भारत पाकिस्तानने अणु चाचण्या केल्यानंतर दोन्ही देशातील संबंध चांगलेच ताणले गेले. परंतु वाजपेयी यांनी मैत्रीचा हात पुढे करून संबंध निवळण्याचा प्रयत्‍न केला व त्यासाठी ते स्वतः लाहोरला जाऊन आले होते. 1998-99 च्या हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करातून अनेक तुकड्यांना मुजाहिदीनच्या वेषात भारतात नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यात आले. या कारवाईला ऑपरेशन बद्र असे नाव देण्यात आले व कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला. नियंत्रण रेषेच्या जास्तीत जास्त आत घुसखोरी करून राष्ट्रीय महामार्ग 1 च्या जवळ यायचे. असे केले की, महामार्गावर कायमस्वरूपी ताबा मिळवता येईल आणि नंतर राजकीय वजन वापरून काश्मीरच्या प्रश्नाचे आंतराष्ट्रीयीकरण करणे पाकिस्तानला सोपे पडेल असा हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता. भारताला नवीन नियंत्रण रेषा मान्य करायला भाग पाडले की. लडाख व सियाचीनला भारतापासून तोडणे सोपे जाईल असा पाकिस्तानी युद्धनीतिज्ञांचा कयास होता. तसेच घुसखोरी दरम्यान कारगिल/काश्मीर परिसरात अंतर्गंत बंडखोरी भडकावून भारताला अजून बुचकळ्यात पाडण्याचा पाकिस्तानी व्यूह होता. भारतीयांनी सियाचीन हिमनदीवर नियंत्रण मिळवण्यात जी क्‍ऌप्ती वापरली तसाच काहीसा प्रकार पाकिस्तानने केला असा काही लेखकांचा सूर होता.

         

कारगिल युद्ध स्मारक हे भारतीय सैन्यदलाने द्रास शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर टायगर हिलच्या दिशेने उभारलेले स्मारक आहे. हे तोलोलिंग टेकडीच्या पायथ्याशी आहे.हे स्मारक श्रीनगर-लेह ‘राष्ट्रीय महामार्ग क्र. 1 डी’वरआहे. स्मारकातील भिंतीवर कारगिल युद्धात शहीद झालेल्या सर्व सैनिकांची आणि सैन्याधिकाऱ्यांची नावे कोरली आहेत. दरवर्षी या स्मारकात 26 जुलै हा दिवस कारगिल हुतात्म्यांचा स्मरण दिवस म्हणून पाळला जातो. कारगिलला पर्यटन स्थळाचे महत्त्व प्राप्त झाले आहे. जेथे पाकिस्तानने बॉम्ब फोडले होते तेथे आज एक कारगिल हाईट्स नावाचे हॉटेल आहे. हॉटेलात एक जुना बंकर ग्राहकांच्या विलोकनार्थ शाबूत ठेवला आहे. असे बंकर पाकिस्तानी सैन्याच्या घुसखोरीनंतर लडाखच्या प्रत्येक घरात बनले होते. लोकांनी मागणी केल्यावरून ‘लडाख हिल डेव्हलपमेन्ट काऊन्सिल’ अस्तित्वात आले. त्यामुळे आता कारगिलमध्ये 40 हून अधिक हॉटेले झाली आहेत. स्थानिक रहिवाशांच्या घरात राहण्याची सोय होते. कारगिलला 2016 या वर्षात 42 हजार, 2017 मध्ये 67 हजार तर 2018 या एकाच वर्षात एक लाख सात हजार पर्यटकांनी भेट दिली.

26 जुलै 2019 या दिवशी कारगिल युद्धाला वीस वर्षे झाली. त्याच्या एक दिवस आधी जम्मू ॲन्ड कश्मिर रायफल्सच्या 13 व्या बटालियनची एक बाईक रॅली उत्तराखंडातील दर्रापासून सुमारे 1850 किलोमीटरचा प्रवास करून 21 दिवसांनी लडाखमधील द्रासला पोचली. शेफ संजीव कपूर यांनी सैनिकांसाठी खास तिरंगी खीर बनवली होती. सर्व सैनिकांनी व अधिकाऱ्यांनी त्या दिवशी एकत्र भोजन केले. जवानांना हौतात्म्य वर भारतीय सेनेने 8.24 मिनिटांची एक शॉर्ट फिल्म जारी केली. त्याअगोदर कारगिल ट्रिबूट गीत गायले गेले व वाजवण्यात आले. गीताचे बोल होते, ‘वीर जवानों, तुम्हें न भूलेगा तुम्हारा हिंदुस्तान’ आज 25 वर्ष कारगिल युध्दाला होत आहेत. त्यात हौतात्म्यपत्करलेल्या सैनिकांना मानाचा मुजरा !

प्रवीण बागडे, नागपूर

भ्रमणध्वनी :  9923620919

ई-मेल : pravinbagde@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here