जागतिक प्राणी दिन हा प्राणी हक्क आणि कल्याणासाठी कृतीचा एक आंतरराष्ट्रीय दिवस आहे. जागतिक प्राणी दिनाची सुरुवात सायनोलॉजिस्ट हेनरिक झिमरमन यांनी केली होती. त्यांनी २४ मार्च १९२५ रोजी जर्मनीतील बर्लिन येथील स्पोर्ट पॅलेस येथे पहिला जागतिक प्राणी दिन आयोजित केला होता. या पहिल्या कार्यक्रमाला ५००० हून अधिक लोक उपस्थित होते. पर्यावरण शास्त्राचे संरक्षक संत असिसीच्या संत फ्रान्सिस यांच्या मेजवानीच्या दिवसाशी संरेखित करण्यासाठी हा उपक्रम मूलतः ४ ऑक्टोबर रोजी नियोजित होता. मात्र त्या दिवशी स्थळ उपलब्ध नव्हते. त्यानंतर हा कार्यक्रम १९२९ मध्ये पहिल्यांदा ४ ऑक्टोबरला हलविण्यात आला. दरवर्षी झिमरमन यांनी जागतिक प्राणी दिनाच्या प्रचारासाठी अथक परिश्रम घेतले. शेवटी पर्यावरणासोबतच प्राण्यांचेही संरक्षण व्हावे, तसेच लोकांमध्ये प्राण्यांविषयी संवेदनशीलता आणि आपुलकीची भावना जागृत व्हावी. यासाठी मे १९३१ मध्ये इटलीतील फ्लोरेन्स येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय प्राणी संरक्षण काँग्रेसच्या पर्यावरण परिषदेमध्ये ४ ऑक्टोबर हा जागतिक प्राणी दिन म्हणून सार्वत्रिक करण्याचा त्यांचा प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यात आला आणि ठराव म्हणून स्वीकारण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी ४ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक प्राणी दिवस’ म्हणून ओळखला जातो.
या दिवसाच्या समर्थनार्थ राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह भारतभर दरवर्षी दि. २ ते ८ ऑक्टोबर दरम्यान भारतातील वनस्पती आणि प्राणी यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो. या दरम्यान वन्यजीव सप्ताह- नॅशनल वाइल्डलाईफ वीक साजरा केला जातो. या वर्षी आपण ७० वा वन्यजीव सप्ताह साजरा करत आहोत. वन्यजीव सप्ताह करिता भारतीय वन्यजीव मंडळाची स्थापना करण्यात आली आणि भारताच्या वन्यजीवांचे संरक्षण करण्याच्या दीर्घकालीन उद्दिष्टांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी १९५२ मध्ये वन्यजीव सप्ताहाची संकल्पना मांडण्यात आली. सुरुवातीला वन्यजीव दिन १९५५ मध्ये साजरा करण्यात आला, तदनंतर १९५७ मध्ये वन्यजीव सप्ताह म्हणून श्रेणी सुधारित करण्यात आला. नामशेष होत चाललेल्या वन्य पशुपक्ष्यांबाबत जागृती निर्माण करणे हा त्यामागील हेतू आहे. आता या मूळ हेतूचा काळानुसार विस्तार झाला आहे. वन्यजीवांनी मानवी आयुष्यात प्रवेश करण्यामागची कारणे समजावून दिली जात आहेत. खरे तर कोणताही वन्यजीव स्वत:हून माणसांवर हल्ला करत नाही. परंतु त्यांच्या राहण्याच्या जागेवर शेती, रस्ते वा बांधकामाच्या रूपाने होणारे मानवी आक्रमण मर्यादे पलीकडे गेले की ते जंगलाच्या सीमेवरील खेड्यांत घुसून मुख्यत: पोटासाठी गाई गुरे मारतात व त्यातून मानव आणि वन्यजीव असा संघर्ष उद्भवतो. भारतासहित जगातील इतरही पुरातन संस्कृतींमध्ये सांगितल्याप्रमाणे मानव आणि वन्यजीवात मैत्री असणे ही संपूर्ण पृथ्वीची गरज आहे, कारण वन्यजीवांखेरीज मानव सुखाने राहूच शकणार नाही. ही जागृती रुजवण्यासाठी भारत सरकारने इंडियन बोर्ड ऑफ वाईल्डलाईफची स्थापना पूर्वीच केली आहे. जंगल सीमेवरील स्थानिकांना याबाबत योग्य माहिती, मार्गदर्शन व सुविधा पुरवावी तसेच वन्यजीवांबद्दल माहिती मिळवून त्यांचा जीवनक्रम समजून घ्यावा; ज्यामुळे त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर होऊ शकतील.
जागतिक प्राणी दिनाच्या चळवळीला ॲनेका स्वेन्स्का, ब्रायन ब्लेस्ड आणि मेलानी सी सारख्या अनेक सेलिब्रिटींनी समर्थन दिले आहे. सर्व सृष्टीवर प्रेम करा’ हे भारतीय संस्कृतीमध्ये अनेक प्रकारे सांगितले आहे. जगात अनेक ठिकाणी प्राणिमात्रांना क्रूरपणे वागवले जाते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्षच केले जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे पूर्वीची घनदाट जंगल तुटून तिथे गावाची नगरे व नगरांची महानगरे होत असताना भरपूर प्रमाणात जंगल तोड झाली. त्यामुळे प्राण्यांचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. काही पाळीव प्राण्यांना अतिशय चांगले वागवले जाते, तर काहींना दिवसभरात खायला मिळत नाही. ही समस्या जगापुढे आणण्यासाठी जगभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. लहान-मोठ्या, पाळीव-भटक्या अशा सर्व प्राणिमात्रांचा यांमध्ये समावेश होतो. अर्जेंटिना मध्ये 1908 पासून हा दिवस 29 एप्रिल रोजी पाळला जातो, ज्याला ब्युनोस आयर्सच्या प्राणी संरक्षण संघटनेचे अध्यक्ष इग्नासिओ लुकास अल्बारासिन यांनी प्रोत्साहन दिले . योगायोगाने 1926 मध्ये त्याच तारखेला अल्बररासिन मरण पावले, त्यामुळे देशातील प्राण्यांच्या हक्कांच्या चळवळीत अग्रगण्य असलेल्या त्यांना श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस बनला. 2003 पासून जागतिक प्राणी दिन संयुक्त राष्ट्र स्थित प्राणी कल्याण चॅरिटी, नेचरवॉच फाउंडेशन द्वारे 2023 च्या उत्सवासाठी लाँच केलेल्या नवीन जागतिक प्राणी दिन वेबसाइटसह समन्वयित केले आहे. बोलिव्हिया, बहामास, चीन आणि कोलंबिया सारख्या अनेक देशांनी जागतिक उत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी वार्षिक कार्यक्रम चालवले आहेत. आज जागतिक प्राणी दिनानिमित्त सर्व प्राणी प्रेमींना हार्दिक शुभेच्छा!
प्रवीण बागडे
नागपूर
भ्रमणध्वनी: ९९२३६२०९१९
ई-मेल: pravinbagde@gmail.com