जीवन मंगलमय होण्यासाठी नैतिकता पाळावी (वर्षावासाचा उद्देश)

0

“चरथ भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय, बहुजन सुखाय, लोकानुकम्पाय, अत्थाय हिताय देवमनुस्सानं ।

देसेथ भिक्खवे धम्मं, अदिकल्याणं मज्झकल्याणं, परियोसानकल्याण, सात्थ सब्यञजनं ब्रम्हचरियं पकासेथ”॥

        थागतांनी धम्म प्रचार व प्रसारासाठी भिक्खूंना आदेश दिला. भिख्खूहो, बहुजनांच्या हितासाठी, सुखासाठी, लोकांवर अनुकंपा करण्यासाठी, मानवांना कल्याणकारी, धम्मपदेश करण्यात तुम्ही प्रवृत्त व्हा, प्रारंभी कल्याणपद, मध्यंतरी कल्याणपद आणि शेवटीही कल्याणपद अशा या धम्म मार्गाचा लोकांना उपदेश करा. वर्षावास म्हणजे  पावसाळ्यातील निवास आषाढी पौर्णिमेपासून आश्विन पौर्णिमेपर्यंत, या तीन महिन्यात फक्त बुद्ध विहारात जीवन व्यतीत करणे. या काळात भिक्खूंनी धम्म-प्रचार-प्रसारासाठी स्वत:ला तयार करणे, बौध्द उपासक/उपासिकांना धम्माचं महत्व सांगणे, ध्यान-साधना करणे, धम्मदान स्विकारणे आदि नित्यक्रम करावे असा आदेश तथागतांनी भिक्षूसंघास दिला. त्याप्रमाणे ते आचरण करीत असत. यालाच वर्षावास म्हणण्याची प्रथा सुरु झाली, ती आजतागायत अविरत सुरु आहे यात खंड नाही. इथेच वर्षावासाचं महत्व सर्वश्रुत आहे. तथागतांनी बुद्धत्व प्राप्तीनंतर पंचवर्गीय संन्याशांना आपला अष्टांगिक मार्ग, प्रतीत्य समुत्पाद, चार आर्यसत्य हे समजावून दिल्यानंतर त्यांना ते कळले. इसिपतन वन (आधुनिक सारनाथ), वाराणसी येथे अनुत्तर असे पहिले धम्मचक्र प्रवर्तन केले. आश्विन पौर्णिमेला एकसष्ठ अर्हत भिक्षुंच्या समवेत धम्मचक्राची घोषणा केली. चारही दिशांना जाऊन बहुजन हिताय – बहुजन सुखाय धम्माची अशी सिंहगर्जना केली.

     

तथागत बुध्दांची पहिली धम्मसभा आषाढी पौर्णिमेला झाली. पुढे भिख्खूसंघाच्या निर्मीतीनंतर दरवर्षी याच कालावधीत उपासक वर्षावास करतात. याची सुरुवात आषाढी पौर्णिमेला होते आणि याच काळात पंढरीची वारी ही सुरु होते, हे निव्वळ योगायोग नाही. भगवान बुद्धाच्या काळात बुद्धांनी सर्व भिक्षूंना धम्माचा प्रसार करण्याचे आदेश दिले आणि सर्व बौद्ध भिख्खू या कामात गुंतले होते, परंतु असे केल्याने त्यांना बऱ्याच संकटांना आणि विशेषतः पावसाळ्यात नद्यांमध्ये अनेक संकटांना सामोरे जावे लागे. पुरामुळे बौद्ध भिख्खू वाहून जात आणि त्यांच्या चालण्याने शेतातील पिकांचे नुकसान होत त्यांनी हे तथागतांना सांगितले, बुद्धांनी आदेश दिला की आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत सर्व भिक्षूंनी एकाच ठिकाणी रहावे, भिक्षेसाठी गावात जाऊ नये. एकाच ठिकाणी राहून धम्माचे पठण अध्ययन करावे. जर गरज पडली तर भिक्षू आपल्या गुरूंकडून जास्तीत जास्त एका आठवड्याचा वेळ घेऊन विहारातून बाहेर जाऊ शकतात, भगवान बुद्ध काळापासून वर्षावास अस्तित्वात आहे. तथागतांनी 45 वर्षावास श्रावस्ती, जेतवन, वैशाली, राजगृह इत्यादी ठिकाणी केले. अशा प्राचीन गुरू-शिष्य परंपरेचे पालन आजही भारतात आणि बौद्धराष्ट्र थायलंड, म्यानमार, श्रीलंका, कंबोडिया आणि बांगलादेश पालन करतात.

         आषाढ पौर्णिमेला वर्षावास सुरू होतो आणि अश्विन पौर्णिमेला संपन्न होतो, बौध्द धम्मात वर्षावासाला अनन्य साधारण महत्व आहे, सर्व बौध्द उपासक उपासिकांनी या तीन महिन्याच्या कालावधीत स्वःताच्या घरी रोज बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या “बुध्द आणि त्यांचा  धम्म” या पुस्तकाचे किंवा अन्य बुद्ध धम्माशी संबंधित पुस्तकाचे रोज सामुहिक वाचन करून त्यावर मनन चिंतन करावे व त्याचे आपल्या जिवनात अनुकरण केले पाहिजे, नियमितपणे शेजारच्या बुध्दविहारात जावून धम्म श्रवण करावा व धम्ममार्गावर आरूढ व्हावे, धम्मदान द्यावे, उपोसथ व्रत घेऊन अष्टशिलाचे पालन करून सदगुणाचा पाया मजबूत करावा, आपल्याप्रमाणे प्रत्येक कुटुंबास यानुसार आचरण करण्यास प्रोत्साहित केल्यास बौध्द उपासकांचा मोठा संघ तयार होईल व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलेल्या प्रबुध्द भारताचे दिव्य स्वप्न साकार होण्यास हातभार लागेल.

        बुद्धांनी शिकवले की उपोसथ दिवस म्हणजे “अशुद्ध मनाची शुद्धता” करण्याचा दिवस होय, उपोसथ किंवा उपोस्थ या शब्दाचा अर्थ उप+स्था म्हणजे एकत्र बसणे होय, भिक्षुसंघाची एकसंघपणा टिकवून राहण्यासाठी उपोसथ विधी खूप महत्त्वाचा मानला गेला. उपोसथ विधी बुद्ध काळापासून अस्तित्वात आहे आणि बौद्ध देशांमध्ये उपोसथ विधी श्रद्धापूर्वक पाळला जातो. अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी भिख्खू पटिमोक्खा (आचारसंहितेचे नियम) यांचे पाक्षिक कबुलीजबाब आणि पाठ होते. या दिवशी बौद्ध उपासक आणि भन्ते धम्म अध्ययन आणि ध्यानाची तीव्रता आणखीन वाढवतात. विनयासंबधी जर आचारात काही दोष आला असेल तर उपोसथ दिनी भन्ते सर्वांसमोर कबुलीजबाब देत असत व संघ नियमानुसार त्यांना पुढील कारवाईस समोर जावे लागत. हा विधी खूप पवित्र मानला जाई, आजही त्याचे पालन केले जाते.

धम्माप्रती वचनबद्ध उपासक गृहस्थ पंचशील, दहा परिमिता, अष्टांगिक मार्गाचे पालन करतात धम्म आचरणात उत्साह जागृत होण्याकरिता समाधी मार्गाचे, ध्यानाचे अवलंबन करतात. जेव्हा शक्य असेल तेव्हा उपासक या दिवसाचा उपयोग स्थानिक विहारात जाण्याची संधी म्हणून करतात. या दिनी संघाला विशेष दान अर्पण केले जाते, धम्म प्रवचन ऐकले जाते आणि रात्री उशिरापर्यंत धम्म बांधवा सोबत ध्यान-धारणा केली जाते. जे उपासक विहारात जाऊ शकत नाहीत अशांना ही उपोसथ दिन संधी देतो कि, आपले ध्यान करण्याचे प्रयत्न वाढवावे कारण या पवित्र दिनी जगातील हजारो उपासक ध्यान धारणेचा अभ्यासात वुद्धी होण्याच्या दिशेने पाऊल टाकतात.

       तथागतबुद्धांच्या आदेशानुसार भिक्खुसंघ धम्म प्रचारासाठी सर्व ऋतूत चारही दिशांना पायी फिरत असत, या तिन्ही ऋतुत त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत असे, नैसर्गिक संकटांचा सामना करून प्रतिकूल परिस्थितीतही ते धम्माचा प्रचार-प्रसार करीत असत. हे सर्व लक्षात घेऊन तथागत बुद्धांनी भिख्खू संघाला आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत, एकाच ठिकाणी विहारात राहून धम्माचा अधिक अभ्यास करीत आसपासच्या परिसरातील उपासकांना धम्मज्ञान देण्याबाबत सूचना दिल्या, आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ वर्षावास म्हणुन तेव्हापासुन संपन्न होऊ लागला (वर्षावास म्हणजे पावसाळयातील निवास) वर्षावास काळात श्रध्दावान उपासक विहारात जावून धम्म-श्रवण करतात, विहारात भिख्खूंना श्रध्दाभावनेने भोजनदान करतात व आजही सातत्याने सुरु असतात. फार महत्व आहे या पोर्णिमेचे….. आपण आपली संस्कृती जपली पाहिजे.

प्रविण बागडे

नागपूर ,भ्रमणध्वनी :  9923620919

ई-मेल : pravinbagde@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here