ज्यांची प्रबोधनपर पुस्तके वाचून आमचे मस्तक सशक्त झाले,महाराष्ट्रातील बहुजन समाज वैचारिकदृष्ट्या जागृत झाला,असे सत्य इतिहासाची महाराष्ट्राच्या मनामनात पेरणी करणारे जहाल लेखक आणि थोर इतिहास तज्ञ आदरणीय मा.म.देशमुख यांचे निधन म्हणजे फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीची अपरिमित हानी होय. राष्ट्र जागृतीपर लेखमाला अंतर्गत त्यांनी लिहिलेली प्रबोधनपर पुस्तके लाखो युवकांना बहुजनांचा सत्य इतिहास दाखविणारी मार्गदर्शक ठरली.
“मध्ययुगीन भारताचा इतिहास” या पुस्तकात छ्त्रपती शिवाजी महाराजां विषयी जहाल सत्य मांडल्या बद्दल नागपूर मधील प्रतिगामी लोकांनी २७ जानेवारी १९६९ रोजी मा.म.देशमुख यांची जिवंतपणी प्रेतयात्रा काढली होती.जिवंतपणी प्रेतयात्रा निघालेला हा एक क्रांतिकारी लेखक साहित्य क्षेत्रात अद्वितीय ठरला.आंबेडकरी युवकांनी त्या प्रतिगामी लोकांना तेथून हाकलून लावून मा.म.देशमुख यांची सन्मान यात्रा,गौरव यात्रा काढली.हा प्रसंग मा.म.यांच्या जीवनातील अविस्मरणीय अनुभव ठरला.त्यांच्या प्रत्येक पुस्तकाच्या शेवटच्या पानावर ते हा प्रसंग आवर्जून मांडत आणि बहुजन युवकांची कृतज्ञता व्यक्त करीत.
आम्ही बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड-राजा येथे राजमाता जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त जे प्रबोधनपर कार्यक्रम घेत होतो,त्या कार्यक्रमांना मा.म.देशमुख आवर्जून उपस्थित राहून आम्हाला प्रोत्साहन देत होते.
आदरणीय मा.म.देशमुख म्हणजे बहुजनांना जागृत करणारा एक सत्यवादी लेखक,निडरपणे सत्य सांगणारा एक खंबीर वक्ता! त्यांची जवळ-जवळ २० ते २५ पुस्तके,विविध कार्यक्रमातील भाषणे आणि यु ट्यूब वर सध्या उपलब्ध भाषणे ऐकली तर मा. म.देशमुख यांच्या संपूर्ण जीवन संघर्ष आपणा समोर उभा राहतो. अशा या जहाल क्रांतिकारी सत्यशोधकास शेवटचा क्रांतिकारी जयभीम ! भावपूर्ण आदरांजली.
@उज्वलकुमार.