सिध्दार्थ गौतमाने आपल्या सर्वस्वाचा, सर्व सुखोपभोगाचा व राजसत्तेचा त्याग केला. हा प्रसंग म्हणजे भारतात त्या काळी उदयास येत असलेल्या एका नवीन समतावादी युगाची सुरुवात म्हणावी लागेल.
गौतमाच्या मनात असंख्य विचारांचे काहूर माजले होते. या गुंतरगुंतीच्या व दुख:दायक व क्लेशदायक या काहूरातून स्वत: मुक्त होणे, अखिल मानवाला मुक्त करणे, या काहूराचे उगमस्थान नष्ट करुन त्याचा लय करणे या बद्दल सतत चिंतन व प्रदीर्घ मनन करीत असतांना त्यांना दिसून आले की, मानवी जीवनात दु:खमय अर्वाचीन अज्ञान, अंधश्रध्दा, द्वेष, क्रोध, विषमता, शोषण अशा अनेक प्रवृत्ती आहेत. या समस्यांचे उच्चाटन करण्याचा परिणामकारक व प्रभावी मार्ग शोधून काढला पाहिजे. त्यांचा एकच ध्यास त्यांना लागला होता. त्यांना खात्री होती की, एकदा का नाविण्यपूर्ण मार्ग सापडला व त्याचा उपयोग प्रामाणिकपणे आणि सचोटीने केला तर अखिल वि·ाातील सर्व प्राणीमात्रांची दु:खातून मुक्तता होईल, त्यांचे कल्याण होईल, त्यांची सर्वांगीण प्रगतीही होईल. इतकेच नव्हे, तर समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय या नैतिक मुल्यांवर आधारलेल्या एका उच्चतम मानवी संस्कृतीचा उदय होईल. सिध्दार्थाचा गृह त्याग म्हणजेच मानवी संस्कृतीच्या प्रदेशात जाण्याचे जणु एक महाद्वारच होते, असे म्हणावे लागेल.
भगवान बुध्दाने सारनाथ येथील मृगदयावनात बुध्दत्व प्राप्ती नंतर थोडया दिवसांनी जो प्रथम धम्मोपदेश केला, त्याला “धम्मचक्र प्रवर्तन” म्हटल्या गेले. मानवी जीवनातील दु:ख समुळ नष्ट करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे, अष्टांगीक मार्ग, सदाचाराचा, सदगुणाचा मार्ग, जो तथागताने संपूर्ण जगाला दिला.
2500 वर्षा पूर्वी भारतातुन लोप पावलेला बौध्द धम्म परमपूज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महाप्रयासामुळे व दृढनिश्चयी नेतृत्वामुळे या देशात 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागनगरीत अवतीर्ण झाला. या दिवशी या महामानवाच्या जाहीर आदेशानुसार वंचितांना जगण्याचे बळ देत गुलामगिरीत जखडलेल्या शेकडो पिढयांचे मुक्तिदाता ठरलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार न देणारा हिंदूधर्म नाकारत बुध्दधम्म घेऊन, जागतिक धम्म प्रवर्तन केले. भारतीय समाजाने (बहुसंख्य अस्पृश्य) एवढया प्रचंड अगणित संख्येने बुध्दधम्माचा स्वीकार करणे ही मानवांची एक उत्क्रांत अवस्था आहे असे मानले जाते.
बौध्द धम्माने पुन:श्च या देशात पदार्पण करण्याची ही एैतिहासिक घटना महाराष्ट्रात घडून आल्याने महाराष्ट्र भूमी धन्य-धन्य झाली, पुनीत झाली. सम्राट अशोका नंतर महान दिव्य-भव्य अशी “धम्मक्रांती” डॉ बाबासाहेबांनी घडवून आणली. सर्व प्रकारचे शोषण नाकारले. प्रज्ञा, शील, करुणेचा मानवतावाद सांगीतला. बुध्दाचं तत्वज्ञान म्हणजे शांतपणे पण ठामपणे अन्यायाला विरोध करणं आणि समानतेसाठी लढणं हेच ध्येय आहे.
महाराष्ट्रातील पुर्वाश्रमी अस्पृश्य गणल्या जाणाया सर्वच समूहाची अथवा अस्पृश्येतर लोकांनी या पवित्र धर्माचा स्वीकार केला नसला तरी, ज्या समाजाने बौध्द धम्माचा स्वेच्छेने स्वीकार केला आहे त्या समाजाला आपल्या अस्मितेची पूर्ण जाणीव झाली आहे. त्या समाजाने बौध्द धर्माचा स्वीकार करुन इतर समाज बांधवांच्या निदर्शनात आणून दिले की, जो समाज इतरांची गुलामगिरी स्वीकारुन लाचारीचे जीवन जगण्याचे नाकारतो, त्याच समाजाची शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक अशा तीनही बाजुने सर्वांगीण प्रगती होत असते झालीच आहे. तो समाज उन्नतीच्या शिखरावर पोहचत असतो पोहचला सुध्दा. परंतू शोकांतिका अशी आहे की, आज समस्त बौध्द समाजामध्ये धम्म आचरणाच्या बाबतीत दुबळेपणा जाणवतो. त्यांच्या मनात एक प्रकारची उदासीनता आढळून येते. त्यामूळे धम्मश्रध्दा वृध्दींगत होण्यास वाव मिळत नाही. याची कारण मिमांसा करण्याची गरज आहे.
धर्मांतर होवून 68 वर्षे लोटत आहेत, तरीही बौध्द समाजातील असंख्य बौध्द अनुयायी आपल्या अज्ञानातच धुंद आहेत. आज दीक्षांतरीत बौध्द समाज देव-देवस्की, मंत्र-तंत्र, बुवा-बावांच्या नांदी लागलेला दिसत नसता, तर तो विज्ञानवादी बुध्द-धम्माच्या तत्वाप्रमाणे आचरण केले असते. बौध्द समाजाची स्थिती ती आज आहे त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रमाणात प्रगती झाली असती. तो नावाने बौध्द नसुन आचार-विचाराने बौध्द झाला असता. तसे पाहिले तर यामध्ये जून्या चाली-रितींना पूर्ण आहारी गेलेल्या अशिक्षित लोकांचा भरणा तर आहेच, परंतु सुशिक्षित लोकांचा भरणा देखील कमी नाही.
आजच्या समस्त बौध्द समाजाच्या वैशिष्टयापैकी सर्वात ठळक वैशिष्टय म्हणजे सुशिक्षित वर्गाची पराकोटीला गेलेली स्वार्थवृत्ती. आपसापसामधील मतभेद व एकमेंकांबद्दलची द्वेष भावना. सुशिक्षित लोकांनी निदान आपल्या भावी पिढीसाठी आपल्या समाजाचा मागील इतिहास विसरुन जाता कामा नये. कारण आपण आपल्या समाजाचा मागील इतिहास विसरलो तर आपल्या सारखे करंटे आपणच.
तेव्हा बौध्द बांधवांनी ही जाणीव ठेवावी की, आपल्याला जे वैभव लाभले आहे, ते केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक परिश्रमामुळेच, त्यांच्या पुण्यांईनेच……एवढा तरी सर्वांनी आपल्या मनात सदैव कृतज्ञतेचा भाव ठेवावा. केवळ प्रतिमेला हार घालून त्यांच्या प्रतिमांसमोर मेणबत्या व अगरबत्या प्रज्वलित करुन भागणार नाही तर कृतज्ञतेची भावना ठेवून आपणांस जे काही अल्पसे का होईना, वैभव प्राप्त झाले आहे. त्यांच्याच सहाय्याने इतरांना सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक बाबतीत प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करण्यासाठी तन-मन-धनाने मदत करावी. बुध्द-धम्म संघ यांचे प्रती अधिक श्रध्दा, निष्ठा वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, तेव्हाच धम्मचक्राची गती वाढेल. एकीकडे कलबुर्गी येथे 5000 लोकांना धम्मदीक्षा कन्नड भाषेत 22 प्रतिज्ञा देण्याचं धाडस श्रीमती अंबिका लक्ष्मीकांत हुबळी यांनी केले. एवढया मोठया प्रमाणात दीक्षा देणारी ती भारतातील पहिली महिला आहे. दुसरीकडे आपण देवी-देवतांच्या मागे भरकटत चाललोय!
बौध्द धम्मावर अनेक नामवंत असे मराठी ग्रंथ सर्वसाधारण वाचकांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत प्रकाशित झालेले आहेत. या सर्वांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा “भगवान बुध्द व त्यांचा धम्म” हा वंदनीय ग्रंथ सर्व बौध्द अभ्यासकांनी व साहित्यिकांनी प्रमाणभूत मानलेला आहे आणि या ग्रंथाच्या आधारे अनेक बौध्द साहित्यिक व अभ्यासक आपल्या मौलिक विचारांद्वारे समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत, त्यात आपण सुध्दा सामील व्हावे इतुकी बौध्द बांधवांकडुन अपेक्षा करायला काही हरकत नाही. तेव्हाच बौध्द धम्म शिगेला पोहचेल. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना मंगलकामना !
प्रभाकर सोमकुवर
नागपूर
भ्रमणध्वनी क्र. 09595255952