रक्तदान करण्यासाठी पूर्वीइतके दाते आता मिळत नाहीत. नवे दाते तयार करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम राबवण्यासहित तरुणांना रक्तदानासाठी प्रोत्साहन देण्याची गरजही सातत्याने व्यक्त होते. वातावरणातले बदल तसेच बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचा संसर्ग, हिमोग्लोबीन कमी असल्यामुळे महिलांचा रक्तदानातला कमी सहभाग हीदेखील त्यातील महत्त्वाची कारणे आहेत. राजकीय पक्ष नेत्यांचे वाढदिवस वा स्मृतीप्रीत्यर्थ महाशिबिरे घेतात. तेथे गरजेपेक्षा अधिक रक्तसंकलन झाले की रक्त वाया जाऊ शकते. ज्या रक्तपेढ्यांना रक्ताची गरज आहे, त्यांना मुदत संपण्यापूर्वी रक्त उपलब्ध करायला हवे, हा संकेत आणि समन्वय साधला जात नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य रक्त संक्रमण परिषदेने सर्व रक्तपेढ्यांना ई-रक्तकोषवर नोंदणी करण्याचे निर्देश दिले आहेत. या सूचना सातत्याने करण्यात येतात. तरीही ही नोंद होत नाही. रक्ताच्या उपलब्धतेचे नियोजन हे ठराविक काळासाठी न करता ते वर्षभरासाठी करण्याची गरज आहे. मात्र, हा निकष पाळला जात नाही. लोकसंख्येपैकी एक टक्का वार्षिक रक्तदान व्हायला हवे, हा निकष असला तरीही प्रत्यक्षात मात्र आता वाहतूकवर्दळ वाढल्यामुळे अपघातांची, शस्त्रक्रियांची वाढती संख्या, प्रसूतीतील रक्तस्राव तसेच इतर आजारांमध्ये द्याव्या लागणाऱ्या रक्ताचे प्रमाण वाढते आहे. रक्ताची गरजी वाढते आहे. त्यामुळे संकलनक्षमता वाढवण्याची गरज आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या निकषानुसार महाराष्ट्रात वर्षाला अंदाजे बारा लाख युनिट रक्ताची गरज असते. महिन्याला सरासरी एक लाख युनिट रक्ताची गरज असते. रक्तसाठवणूक करण्याची तीस ते पस्तीस दिवसांची मुदत आहे त्यापेक्षा अधिक काळ रक्त साठवून ठेवता येत नाही. या मुदतीत ते वापरावे लागते. रक्तदानाची जनजागृती करण्यासाठी राज्यात ३५२ सार्वजनिक तसेच खासगी रक्तपेढ्या आहेम. या रक्तपेढ्यांमध्ये हे काम होते. प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या तसेच दिवाळीच्या सुटीत अनेकजण बाहेर जातात. त्यामुळे पुरेसे रक्तदाते नसतात. रक्तदान मोहिमेवर त्याचा परिणाम होतो. शाळा महाविद्यालये बंद असतात. कॉर्पोरेट ऑफिसमधूनही या दिवसांत मोठा प्रतिसाद मिळत नाही. या साऱ्या कारणांमुळे रक्ताचा काही वेळा तुटवडा जाणवतो.प्रत्येक वर्षी मे महिन्यासह दिवाळीच्या सुटीतही रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. सणासुदीच्या, सुटीच्या काळात रक्ताची उपलब्धता राज्यात व्यवस्थित राहायला हवी, या दृष्टीने नियोजन हवे. उष्म्याचा जोर वाढता असल्यानेही रक्तदानावर परिणाम होतो. बदलते हवामान, करोनामुळे मिळालेला धडा, रक्तदात्यांची घटत चाललेली संख्या लक्षात घेऊन राज्यात रक्तदान मोहिमेला चालना देण्याची गरज आहे.
राज्यात १३ हजार थॅलेसेमिया रुग्ण आहेत. त्यांना दर २१ दिवसांनी रक्तसंक्रमण लागते. रक्ताचा तुटवडा निर्माण झाला तर या लहान मुलांन सर्वाधिक त्रास होतो. या मुलांना योग्यवेळी रक्त मिळावे आणि आपत्कालीन परिस्थितीत तुटवडा पडू नये, यासाठी रक्त संकलनातील काही हिस्सा राखीव ठेवण्यात येतो.
आता मे महिना सुरू झाला असला तरी राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा नसल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून सांगण्यात आले. २३ एप्रिलला मुंबईत महाशिबिरांमुळे रक्ताची पुरेशी उपलब्धता आहे. ७० ते ८० हजार युनिट रक्त आहे. राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून यासंबंधी निर्देश देण्यात आले आहेत.
प्रत्येक रक्तपेढीत रक्तघटक विलगीकरण सुविधा लागते. त्यानुसार रक्तपेढीत यंत्रसामुग्री बसवण्यात येते. ती तपासून परवाना संमत होतो. मात्र, आजही काही रक्तपेढ्यांमध्ये ही सुविधा नाही. पावसाळ्यात साथी वाढतात. डेंग्यू, मलेरियासह इतर रक्ताच्या दुर्धर आजारांत प्लेटलेटची गरज अधिक असते. त्यामुळे, रक्तघटकांचे दान व रक्तातून घटकांचे विलगीकरण या दोन्ही प्रक्रियांबाबत जनजागृती आवश्यक आहे. मुंबईत टाटा रुग्णालयात प्लेटलेट दान केले जाते.
रक्ताची उपलब्धता किती आहे, याची माहिती संकेतस्थळासह ई-रक्तकोषवर अपलोड करण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित होणे, इंटरनेटची अनुपलब्धता यामुळे अनेकदा तांत्रिक अडचणी येतात. साठवणूक क्षमतेसाठी लागणारे तापमान असणे हेही मोठे आव्हान आहे. या परिस्थितीवर मात करण्यासाठी रक्तसुविधांचे सक्षमीकरण तितकेच गरजेचे आहे. ज्या रक्तपेढ्या ‘लोन तत्त्वा’वर पालिका वा सार्वजनिक रुग्णालयांकडून रक्त घेतात, त्यांनी ते तितक्याच तत्परतेने परतही करायला हवे. हे अनेकदा पाळले जात नाही.
डिस्क्लेमर : उपरोक्त लेखातील मते लेखकाची व्यक्तिगत मते आहेत.
लेखक – (स्वामी) जे. सदानंद,सातारा
(कार्यकारी संपादक, आग्रलेख व संपादकीय लेख लिहणे, सामाजिक कार्यकर्ते, कथा, कवी व कांदबरीकार आहेत)