सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘बैलपोळा’

0

 ‘पोळा’ हा सण श्रावण महिन्यात पिठोरी अमावस्याच्या दिवशी येतो या महिन्याची सुरुवात होताच अनेक सण उत्सवांची रेलचेल सुरू होते. पावसाचे दिवस असल्याने सृष्टीचे सौदर्यही खुलून दिसते. अशा या श्रावणात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी या सणांनंतर सरत्या श्रावणात येतो बैल पोळ्याचा सण. संपूर्ण महाराष्ट्रात आजही मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो असा सर्जा-राजाचा सण म्हणजे ‘पोळा.’ शेतकरी बांधवांसाठी पोळा या सणाचे महत्व खूप आहे. या दिवशी वर्षभर शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या बैलाची पूजा केली जाते. या सणाची शहरापासून तर गावापर्यंत धूम असते. परंतु या सणाचे विशेष आकर्षण गावांमध्येच पहावयास मिळते. वर्षभर शेतात कष्ट करून राबणाऱ्या आणि शेतकऱ्याचा खांद्याला खांदा लावून शेतीत मदत करणाऱ्या बैलाला या दिवशी पुजले जाते. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत.

         

गावातील शेतकरी सकाळपासूनच बैलपोळ्याच्या तयारीला सुरुवात करून देतो. या दिवशी सर्वात आधी शेतकरी भल्या पहाटे उठून बैलांच्या गळा आणि नाकातील दोर काढतात., या दिवशी शेतकरी आणि त्यांचे कुटुंब बैलांना धुणे, शिंगे रंगवणे, जुने दोर बदलून नवीन बांधणे, नवीन घंटा बांधणे आणि त्याचा साजशृंगार करतात. यानंतर त्यांना सजवून त्यांची पूजा केली जाते. या दिवशी बैलाच्या खांद्याला हळद व तुपाने किंवा तेलाने शेकतात. याला ‘खांद शेकणे’ अथवा ‘खांड शेकणे’ म्हणतात. बैलाच्या पाठीवर नक्षीकाम केलेली पाठीवर घालायची झुल, सर्वांगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या व घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे व करदोड्याचे तोडे घालुन त्याला खायला सुग्रास अन्नाचा नैवेद्य देतात. काही ठिकाणी बाजरी ची खिचडी सुद्धा बैलांना खाऊ घातली जाते. सायंकाळच्या वेळी गावातील सर्व लोक आपापल्या बैलांना घेऊन गावाच्या मोकळ्या चौकात जमतात. बैलपोळ्याच्या दिवस शेतकरी आणि शेतात काम करणारे बैल व इतर सर्व प्राण्यांच्या विश्रांतीचा दिवस असतोख्‍ म्हणून या दिवशी कोणतेही काम केले जात नाही. यानंतर संध्याकाळच्या वेळी घरातील महिला आपापल्या बैलाची आरती ओवाळून पूजा करतात. ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढली जाते. घरातील स्त्रिया स्वादिष्ट व्यंजन, पुरणपोळी व शिरा बनवतात व बैलांना पुरणपोळीचे जेवण दिले जाते. बैलाची निगा राखणाऱ्या ‘बैलकरी’ घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात.

         

ज्यांच्या घरात बैलजोडी नसते ते लोक माती व लाकडाचे बैल देखील पूजतात. बैलपोळ्याचा सण हा शेतीवर आधारित आहे व हा सण आपल्या बैलांचे व शेती तसेच शेतकऱ्यांच्या कामी येणाऱ्या प्राण्यांचे महत्त्व सांगतो. निसर्ग, मनुष्य आणि सर्व प्राणिमात्रांमध्ये देव आहे व यांची पूजा हीच देवाची पूजा होय, याची जाणीव हा सण आपणांस करवून देतो.   पोळ्याच्या काळात शेतकरी शेतात बैल पाळत नाहीत आणि त्या दिवशी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शाळांना सुट्टी असते. फार प्राचीन परंपरेतील विशेषत: पशुपालक शेतकरी वर्गाने हजारो वर्षापासून जोपासलेला पोळा हा सण. पशुपालन अवस्थे नंतर कृषक अवस्थेत आलेल्या प्राचीन मानव समूदायाचा हा सण. भूमी आणि भाकरीसाठी राबराब राबणाऱ्या श्रमसंस्कृतीचे ते प्रतीक आहे. शेतकरी व शेतमजूराचा सच्चा साथीदार म्हणजे बैल. हे तिन्ही घटकांची परस्पर पुरकता ही अन्नासह अर्थार्जन निर्मितीसाठी देशाचा मूख्य आधारस्तंभ ठरते.

          आपला बैल उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा साजशृंगार खरेदी करतात. बैल सजवितात व पोळ्याच्या मिरवणुकीत भाग घेतात. गावाच्या सीमेजवळच्या शेतावर आंब्याच्या पानाचे एक मोठे तोरण करून बांधतात. या सणाच्या दिवशी महाराष्ट्रातल्या खेड्यांमधल्या प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते व ‍‍त्या जवळ गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोल, ताशे वाजवत एकत्र आणल्या जातात. या वेळेस ‘झडत्या’ म्हणायची पद्धत आहे, त्यानंतर ‘मानवाईक’ ज्याला गावात मान आहे ती व्यक्ति, गावचा पाटील किंवा श्रीमंत जमीनदार तोरण तोडतो व पोळा ‘फुटतो’ नंतर बैल मारुतीच्या देवळात नेतात व नंतर घरी नेऊन त्यांना ओवाळतात. बैल नेणाऱ्यास ‘बोजारा’ देण्यात येतो, शेतकरी वर्गात हा सण महत्त्वाचा मानला गेल्याने या सणासाठी शेतकऱ्यांमध्ये विशेष उत्साह व आनंदाचे वातावरण असते.

           जेव्हा कोणताच धर्म अस्तित्वात आलेला नव्हता तेव्हा पासूनच प्राचीन भारतीय मानव समुदायाने बैलपूजनाची परंपरा जोपासलेली होती हे सिंधू संस्कृतीतील उत्खननातून सिद्ध झालेले आहे. बैल हे श्रमाचे प्रतीक, त्याच्याकडून वर्षभर काम करून घेत असतांना त्याच्या या ऋणाईतून उत्तराई होण्याचा हा दिवस म्हणून पोळा सण साजरा करण्याची ही प्रथा ग्रामीण जीवनात कायम आहे. अलीकडे जरी ट्रॅक्टरद्वारे शेतीची कामे केली जात असली तरी बैलाचे महत्त्व जनमानसात आजही कमी झालेले नाही. वर्षभर शेतकऱ्यांचा सखा बणून राहणाऱ्या या बैलांच्या अपार श्रमातून देशातील तमाम मानवास रोजगार, अन्नधान्य व भोजन मिळते. परंतु या सणानिमित्त पळस या झाडांच्या फांद्या दारासमोर, गोठ्यात, शेतात ठेवण्याचीही परंपरा असल्यामुळे लाखो झाडांची तोड या दिवसावर होते. अवकाळी पाऊस, दुष्काळ या निसर्गाच्या लहरीपणातून शेतकरी व पशुपालकांचा जीव आधीच मेटाकुटीला आलेला असतांना त्यात अशा सणोत्सवाच्या निमित्ताने होणारी वृक्ष तोड योग्य नाही, पर्यावरणाचा ऱ्हास करणारी ही पळस तो‍ड थांबायला हवी.

            बैलपोळ्याचा दिवस हा शेतकऱ्यांची बैलांविषयी असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस होय आणि ही कृतज्ञता या ‘पोळा’ सणाच्या निमित्ताने आम्ही भारतीय सातत्याने जोपासत आलेलो आहोत. भारतीय संस्कृती मनुष्या सोबतच निसर्ग आणि प्राणीमात्रांची देखील पूजा करायला शिकवते. अलीकडे खाजगीकरण व जागतिकीकरणाच्या आडून पशुपालकांसह शेती करणारा शेतकरीवर्ग हा देशोधडीला लागलेला आहे, याची जाण शासनानी ठेवली पाहिजे. त्यातूनच त्याची दिवसें दिवस होत असलेली कुचंबना व आत्महत्या ही योग्य नाही. जर जगवणाराच जर जगला नाही तर एक दिवस स्वदेशीचा ठेंभा मिरवणाऱ्या भारतीयांना विदेशी अन्नाशिवाय जगणे कठिण होऊन बसेल हे विसरता येणार नाही.

             रक्ताचे पाणी करणारा शेतकरी आत्महत्या करतो, उपाशी झोपतो तर या मंदीरात देव-धर्माचे अवडंबर माजवणारा पुजारी, पुरोहित, पंडीत चैनीने तुपाशी खातो हे वास्तव म्हणजे या देशाची शोकांतिकाच म्हणावी लागेल. या देशात गाय ही गोमाता ठरवली जाते, परंतू बैल पिता ठरत नाही. मदिरात मात्र दान-दक्षिणा ऐटण्यासाठी गोमाता नव्हे तर नंदी बैलाचीच प्रतीकृती हवी असते ही विसंगती जोपासणारेच जर संस्कृती व धर्मरक्षक बणून मानवाच्याच जीवावर उठत असेल तर आमच्या धडावर आमचेच डोके व आमचाच मेंदू असल्याशिवाय खरी संस्कृती व खरा धर्म याची सत्यता कळणार नाही. कष्टाशिवाय व्यक्तीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही, सर्वांना‍ बैल पोळ्याच्या अनेक शुभेच्छा !

प्रविण बागडे, नागपूर ,भ्रमणध्वनी : 9923620919 ई-मेल : pravinbagde@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here