रतन टाटा हे एक भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष होते. 1990 ते 2012 या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते आणि ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2017 या कालावधीत ते समूहाचे अंतरिम अध्यक्ष होते, तसेच त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्टचे नेतृत्व करीत होते. ते पद्मविभूषण आणि पद्मभूषण या भारतातील दोन सर्वोच्च नागरी पुरस्कारांचे प्राप्तकर्ते आहेत. रतन टाटा यांना 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2008 मध्ये पद्मविभूषण, भारत सरकारचा तिसरा आणि दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. टाटा यांना 2006 मध्ये महाराष्ट्रातील सार्वजनिक प्रशासनातील त्यांच्या कामासाठी ‘महाराष्ट्र भूषण’ आणि आसाममध्ये कर्करोगाच्या उपचारात योगदान दिल्याबद्दल 2021 मध्ये ‘आसाम वैभव’ असे विविध राज्य नागरी सन्मानही मिळाले आहेत.
त्यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी ब्रिटिश राजवटीत मुंबई येथे झाला होता. ‘रतन’ हे नवल टाटा यांचे पुत्र आणि टाटा कुटुंबातील वंशज हाते, ज्यांना नंतर टाटा समूहाचे संस्थापक जमशेटजी टाटा यांचे पुत्र रतनजी टाटा यांनी दत्तक घेतले होते. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांच्या भाची सूनी टाटा या त्यांच्या आई होत. टाटांचे आजोबा होर्मुसजी टाटा हे रक्ताने टाटा कुटुंबाचे सदस्य होते. 1948 मध्ये टाटा 10 वर्षांचे असतांना, त्यांचे आई-वडील विभक्त झाले तेव्हा आणि त्यानंतर त्यांचे संगोपन केले आणि रतनजी टाटा यांच्या आजी आणि विधवा नवजबाई टाटा यांनी त्यांना दत्तक घेतले. त्यांना एक धाकटा भाऊ (जिम्मी टाटा) आहे आणि नोएल टाटा हे सावत्र भाऊ आहेत, जे त्यांच्या वडिलांच्या दुसऱ्या पत्नी सिमोन टाटा यांचे पुत्र आहेत. टाटा यांनी कधीही लग्न केले नाही आणि त्यांना मूलबाळ नव्हते. 2011 मध्ये त्यांनी सांगितले की, “मी चार वेळा लग्न करण्याच्या जवळ आलो आणि प्रत्येक वेळी मी भीतीने किंवा एका कारणास्तव मागे हटलो”.
मुंबईच्या कॅम्पियन स्कूलमध्ये त्यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, शिमला येथील बिशप कॉटन स्कूलमध्ये शिक्षण घेतले. नंतर त्यांनी 1955 मध्ये न्यूयॉर्क येथील रिव्हरडेल कंट्री स्कूलमध्ये पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पदवी घेतल्यानंतर टाटा यांनी कॉर्नेल विद्यापीठात प्रवेश घेतला, ज्यामधून त्यांनी 1959 साली वास्तुशास्त्र मध्ये पदवी प्राप्त केली. कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलचे व्यवस्थापन कार्यक्रमाचे ते माजी विद्यार्थी होते. 1975 मध्ये त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या सात-आठवड्याच्या प्रगत व्यवस्थापन कार्यक्रमात भाग घेतला. कॉर्नेलमध्ये असतांना टाटा अल्फा सिग्मा फी फ्रेटरनिटीचे सदस्य बनले. त्यानंतर ते त्यांच्या कंपनीत रुजू झाले. तेव्हा ते टाटा स्टीलच्या शॉप फ्लोअरवर काम करायचे.
टाटा समूहाचे संस्थापक असलेल्या जमशेदजी टाटांचा नातू अशा पद्धतीने धडपड करतो आहे हे पाहून जे.आर.डी. प्रभावित झाले. आजीची तब्येत बिघडल्यामुळे तिला भेटायला भारतात आलेल्या रतन यांना जे.आर.डी. यांनी टाटा उद्योग समूहामध्ये येण्याचे निमंत्रण दिले. 1962 च्या डिसेंबर महिन्यात रतन टाटा समूहात दाखल झाले, मात्र समूहाच्या परंपरेनुसार 62 ते 71 त्यांना विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास सांगण्यात आले. जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये अगदी कोळसा उचलण्यापासून ते भट्टीपाशी काम करण्यापर्यंतचे सर्व अनुभव घेतल्यानंतरच 1971 मध्ये त्यांच्याकडे टाटा समूहातील नेल्को या कंपनीची धुरा सोपविण्यात आली. नेल्को ही त्यावेळी तोट्यात चालणारी कंपनी होती. रेडिओ आणि टेलिव्हिजनचे उत्पादन करणारी ही कंपनी पुढील तीन वर्षांमध्ये स्वतःच्या पायावर उभी करण्यात रतन टाटा यांनी यश मिळविले. संपूर्ण बाजारपेठेतील नेल्कोचा हिस्सा दोन टक्क्यांवरून वीस टक्के झाला, पण देशात आणीबाणी जाहीर झाली. पाठोपाठ आलेल्या मंदीमध्ये नेल्कोला आपल्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात अपयश आले आणि ही कंपनी बंद पडली. रतन टाटा यांना अनुभवाला आलेले ते पहिले अपयश होते.
1977 मध्ये रतन टाटांवर एम्प्रेस मिल या टाटा समूहातील बंद पडावयास आलेल्या मिलची जबाबदारी सोपविण्यात आली. एम्प्रेस मिलच्या यंत्रसामग्रीमध्ये अनेक वर्षांमध्ये गुंतवणूक करण्यात आली नव्हती. कामगारांची संख्याही मोठी आणि त्याच्या तुलनेत उत्पादन तूटपुंजे असे चित्र असलेल्या या मिलमध्ये पन्नास लाख रुपयांची गुंतवणूक करण्याची विनंती रतन टाटा यांनी टाटा उद्योग समूहाला केली, पण नानी पालखीवाला, अजित केरकर आणि रुसी मोदी या संचालकांनी त्याला विरोध केल्याने अखेर ही मिलही बंद करण्यात आली. रतन टाटांच्या नावावर दुसरे अपयश जमा झाले. या सर्व प्रकारामुळे रतन टाटा चांगलेच दुखावले गेले होते, पण त्याचबरोबर अनुभवाच्या शाळेमध्ये बरेच काही शिकले होते. 1981 मध्ये जे.आर.डी. टाटा यांनी त्यांच्याकडे टाटा इंडस्टीजची सूत्रे सोपविली. त्याच वेळेस ते त्यांचे वारसदार आणि टाटा उद्योगसमूहाचे भावी प्रमुख असणार हे स्पष्ट झाले होते. 1991 मध्ये जे.आर.डी. यांनी स्वतःच उद्योगसमूहाची सर्व सूत्रे रतन टाटांकडे सोपवून निवृत्ती पत्करली.
त्यानंतर सुरू झालेली यशाची मालिका आणि नवे विक्रम अजूनही सुरूच आहेत. कोरस, जग्वार, टेटली आणि लँड रोव्हर सारख्या जगातल्या नामांकित कंपन्या टाटांनी खरेदी केल्या. त्यात 2000 मध्ये त्यांनी टाटा टी मिळवून टेटली विकत घेतली आणि जगातील सर्वात मोठी टी बेग्ज बनवणारी कंपनी निर्माण केली. 2004 मध्ये साऊथ कोरिया मधील डेवू कमर्शियल व्हेईकलला रतन टाटा यांनी विकत घेतले. टाटा मोटर्स घेऊन जग्वार लँड रोव्हर विकत घेतली आणि टाटा स्टील घेऊन कोरस कंपनीचे अधिग्रहण केले. 2007 मध्ये टाटा ने लंडनमधील कोरस ग्रुप ही स्टील कंपनी विकत घेतली, नंतर तिचे नाव टाटा स्टिल युरोप ठेवण्यात आले. 2008 मध्ये टाटाने कॉर्नेलला 50 दशलक्ष डॉलर भेट दिले, जे विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय देणगीदार बनले. याच काळात टाटा समूहाचे तत्कालीन प्रमुख जे.आर.डी. टाटा यांच्याशी त्यांची भेट झाली. त्यांनी मोठ्या प्रमाणावर भारत-केंद्री गटातील टाटा समूहाला जागतिक व्यवसायात रूपांतरित करण्याच्या प्रयत्न केला.
या भरारीनं देशातल्या तरुणांना नवी ऊर्जा दिली. ‘मोठी स्वप्न पाहाणं आणि ती प्रत्यक्षात आणणं’ हा रतन टाटांचा स्वभाव होता. याच स्वप्नांमधून इंडिगो आणि नॅनोची निर्मिती झाली आणि कुठलीच गोष्ट अशक्य नाही, हे सुध्दा टाटांनी कतृत्वाने सिद्ध करुन दाखविले. हे यश मिळवत असतांना टाटांनी कधीच आपल्या मुल्यांशी तडजोड केली नाही. यामुळंच सचोटी, गुणवत्ता म्हणजे टाटा हे समीकरण तयार झालंय. निवृत्तीनंतर ते नवउद्योजकांना प्रोत्साहन देत असतांना त्यांना श्वासोच्छवासामुळे गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि 7 ऑक्टोबर 2024 पासून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. वय-संबंधित समस्यांमुळे 9 ऑक्टोबर 2024 रोजी वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र सरकार आणि झारखंड सरकारने एक दिवसाचा शोक जाहीर केला. 10 ऑक्टोबर रोजी टाटा यांचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंतिम संस्कारादरम्यान त्यांना लष्करी आणि 21 तोफांची सलामी देण्यात आली. मुंबई पोलिसांनी समारंभपूर्वक ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला आणि त्यांचे पार्थिव भारतीय ध्वजात गुंडाळले गेले.
पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश हळहळला. तांत्रिक, औद्योगिक सर्वच क्षेत्रात टाटा समूहाचे नाव अग्रणी आहे. त्यांनी अनेकांना कौशल्य प्रदान करून रोजगार दिलेला आहे तसेच, त्यांचे विविध क्षेत्रांच्या व उद्योगांच्या विकासासाठी दिलेले योगदान हे अतुलनीय आहे, त्यामुळे भारतातील पहिला कौशल्य विद्यापीठास त्यांचे नाव मिळावे ही अतिशय सन्मानाची गोष्ट आहे. त्याचबरोबर नवीन उद्योगांना सुद्धा त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेऊन सहकार्य केले. ज्येष्ठ उद्याोगपती रतन टाटा यांच्या स्मृतींचे जतन करण्यासाठी आणि उद्योग क्षेत्रातील या महान विभूतीच्या कार्याला आदरांजली देण्याच्या उद्देशाने नुकतेच महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ‘पद्माविभूषण रतन टाटा कौशल्य विद्यापीठ’ असे या विद्यापीठाचे नाव असेल. या नामकरणामुळे विद्यापीठाच्या माध्यमातून होणाऱ्या तांत्रिक प्रगतीस चालना मिळेल आणि युवकांना रतन टाटा यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विद्यापीठात शिक्षण घेण्याचा अभिमान वाटेल. या विद्यापीठाच्या माध्यमातून उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवणे तसेच नवोदितांच्या संकल्पनांना बळ देण्याचे उद्दिष्ट आहे. हा उद्देश रतन टाटा यांच्या विचारांचा आरसा असून त्याचे आचरण म्हणजेच त्यांच्या कार्याला खरी आदरांजली आहे. देशातील एक आदर्श व्यक्तिमत्व, सुप्रसिद्ध उद्योगपती व टाटा समूहाचे अध्यक्ष रतनजी टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
प्रविण बागडे
नागपूर
भ्रमणध्वनी : 9923620919
ई-मेल : pravinbagde@gmail.com