मेजर ध्यानचंदच्या ११९ व्या स्मृतिदिनानिमित्त :*
बर्लीन ऑलिम्पिक दि. १५ ऑगस्ट १९३६, स. ११ वाजता भारताची जर्मनी बरोबर जगज्जेतेपदासाठी हॉकीची फायनल मॅच सुरु झाली. तत्पूर्वी ध्यानचंदने भारताला १९२८ व १९३२ असे दोनदा ऑलिम्पिकचे सुवर्णपदक जिंकून दिले होते. स्टेडियममध्ये खुद्द हिटलर नाझी अधिकाऱ्यांसह हजर झाला त्यावेळी संपूर्ण स्टेडियन ‘Heil Hitler, heil Hitler’ या नावाने दणाणून गेले. प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता, जर्मनी जिंकणार की ध्यानचंद यांचा संघ सुवर्णपदकाची हॅटट्रीक गाठणार.
पहिल्या हाफ मध्ये जर्मनीची अटॅकिंग फिल्ड जबरदस्त होती. परंतु ध्यानचंद यांच्यामुळे एकही गोल करू शकली नाही. पहिल्या हाफला काही मिनिटे कमी असताना ध्यानचंदने बॉलवरची नजर ढळू न देता प्रचंड वेगाने ड्रिबलिंग करत जर्मनीच्या डी मध्ये प्रवेश केला. दुर्दैवाने जर्मनीचा गोलकीपर व त्याची धडक झाली व गोलकीपरच्या लागलेल्या स्टिकमूळे ध्यानचंदचा एक दात तुटला. जखमी अवस्थेत ध्यानचंद यांना मैदानाबाहेर न्यावे लागले. त्याच्या अनुपस्थितीचा फायदा जर्मनीने घेतला व १-० अशी आघाडी मिळवली. संपूर्ण बर्लीन ऑलिम्पिकमध्ये भारताविरुद्ध झालेला तो एकमेव गोल होता.
१५ मिनिटांच्या गॅपनंतर भारतीय संघ ध्यानचंद सह मैदानात उतरले. ध्यानचंद स्पाईक शूज काढून बेअर फूट खेळायला आले . त्याच्या जादुई खेळासमोर जर्मन संघ हतबल झाला. की पहिल्या १५ मिनिटातच ध्यानचंदन यांनी केलेल्या तीन गोलमुळे जर्मन संघांचे मनोधैर्य खचले. राहिलेल्या ३० मिनिटांच्या एकतर्फी सामन्यात भारताने जर्मनीवर ८-० अशी मात केली व सुवर्णपदकाची हॅटट्रीक पूर्ण केली.
तद्नंतर १९५२ साली ध्यानचंदन यांनी लिहिलेल्या ‘गोल’ या बायोग्राफीत म्हटले, “त्याच दिवशी संध्याकाळच्या कार्यक्रमात हिटलर मला भेटू इच्छितो असा निरोप आला. छातीवर प्रचंड दडपण ठेवून मी हिटलरला भेटण्यास गेलो. त्याच्याशेजारी गोबेल्स, हिमलर, रिबेन्ट्रॉप, रोएम व इतर नाझी अधिकारी होते. त्यावेळेस मला कल्पना देखील आली नाही, पुढील तीन वर्षातच ही सर्व मंडळी जगाचा नकाशा बदलविणारे व प्रचंड रक्तपात झालेले दुसरे महायुद्ध खेळणार होते. मी हिटलरला सलाम केला. हिटलरने मला वरपासून खालपर्यंत न्याहाळले. मी व्हाईट पॅन्ट, ब्लेझर व पायात कॅनव्हासचे पीटी शूज घातलेले होते. आमचे पुढील संभाषण दुभाष्यामार्फत झाले. पहिल्या हाफमध्ये झालेल्या जखमेबद्दल हिटलरने माझी विचारपूस केली.”
मी म्हटले, “शुक्रिया जनाब, माझा एक दात मला जर्मनीतच ठेवावा लागणार आहे. आपल्या त्वरित वैद्यकीय उपचारामुळे मी दुसरा हाफ खेळू शकलो. आपल्या आदरतिथ्यामुळे आम्ही भारावून गेलेलो आहोत.” हिटलरने आमचे अभिनंदन केले. पुढील संभाषण ध्यानचंदने ‘गोल’ मध्ये सांगितले :
हिटलर : आपण हॉकी खेळत नसता त्यावेळेस काय करता?
मी : मी इंडियन आर्मी मध्ये कार्पोरेल (नाईक) आहे.
हिटलर : मी सुद्धा पहिल्या महायुद्धात कार्पोरेल या हुद्यावर होतो. आपण हॉकीचे जादूगार आहात. परंतु ब्रिटिश आर्मीने आपला यथोचित सन्मान केलेला दिसत नाही. ध्यानचंद मी तुम्हाला जर्मन आर्मीमध्ये ऑफिसर म्हणून येण्याची ऑफर देतो. विजय कसा मिळवायचा हे आमचे आर्मीसुद्धा आपल्याकडून शिकतील..
मी नम्रतापूर्वक म्हटले : हेर हिटलर, आपण केलेला हा माझा सन्मानच आहे. परंतु प्रथम मी भारतीय आहे आणि भारतीय राहणे पसंद करेन.
हिटलरने हळुवारपणे माझ्यासमोर मान तुकवली व इतर लोकांना भेटण्यासाठी निघून गेला.
बर्लीन ऑलम्पिक मध्ये भारताने एकूण 38 गोल केले त्यापैकी १३ गोल ध्यानचंद यांचे होते. त्यावेळी टीम मॅनेजर स्वामी जगन नाथ यांनी म्हटले, “The best centre forward I had ever seen. He is like the nucleus of an atom and protons, electrons, neutrons revolve around him.”
दुसऱ्या दिवशी जर्मन वृत्तपत्रांमध्ये ध्यानचंदच्या नावाने रकानेचे रकाने भरून आले. त्यात लिहिले, “What a performance by Dhyan Chand who played with barefoot and without tooth.”
संकलन : प्रा. प्रसाद भास्कर