बुलडाणा,(प्रतिनिधी)- संभाजी नगर जिल्ह्यातील फुलंब्री पंचायती मधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,वाकोद येथील ज्या विद्यार्थ्यांना आई किंवा वडील नाहीत अशा सात गरजू विद्यार्थ्यांना या शाळेतील सहशिक्षक उज्वलकुमार म्हस्के यांनी दत्तक घेतलेले आहे.या दत्तक विद्यार्थ्यांना वर्षभर आवश्यक असणारे सर्व शैक्षणिक साहित्य पुरविले जाते.आर्थिक दुरावस्थेमुळे हे विद्यार्थी शैक्षणिक साहित्य खरेदी करू शकत नाहीत त्यांना उज्वलकुमार म्हस्के वर्षभर वह्या,पेन,पेन्सिल,कंपास बॉक्स,कलर बॉक्स,ड्रॉइंग वही,ईतर पुस्तके,शैक्षणिक स्टेशनरी हे आवश्यक साहित्य पुरवितात.
या सात विद्यार्थ्यांना या वर्षीचे शैक्षणिक साहित्य वितरीत करण्याचा कार्यक्रम वाकोद च्या जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आला.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सदाशिव बडक यांनी म्हस्के सरांच्या या सामाजिक बांधिलकी व दानशूरपणाचे कौतुक केले.यावेळी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक विठ्ठलराव साळवे,सांडू शेळके,नितीन शेळके,मंगल पाटील,मंगला वेळे,संगीता वाढोनकर यांच्यासह शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
विद्यार्थी हिताच्या या उपक्रमाबद्दल फुलंब्री पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी क्रांती धसवाडीकर मॅडम,ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेश महाजन साहेब,आळंद केंद्राचे केंद्र प्रमुख संजय भुमे सर यांनी उज्वलकुमार म्हस्के यांचे अभिनंदन केले आहे.