उरण दि १७(विठ्ठल ममताबादे )
कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालयात विद्यार्थ्यांना वाचनाकडे आकर्षित करण्याकरिता दि. १ जानेवारी ते १५ जानेवारी या कालावधीत वाचन पंधरवडा राबविण्यात येऊन वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम घेण्यात आला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. जी. लोणे यांच्या मार्गदर्शनानुसार विविध कार्यक्रम घेऊन हा पंधरवडा साजरा करण्यात आला. या उपक्रमाकरिता महाविद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी सक्रिय सहभाग घेतला. दिनांक १ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा वाजता सर्व विद्यार्थ्यांनी ग्रंथालय अभ्यासिकेत एक तास एकत्रित वाचन केले या सामूहिक वाचनानंतर दररोज नियमित वाचन करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला.
माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे ‘अग्निपंख’तसेच श्री अच्युत गोडबोले यांच ‘मुसाफिर’ आणि विणा गवाणकर यांचे ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकाचे परिचय/ परीक्षण करून दिला गेला. भालचंद्र नेमाडे यांची ”कोसला’ ही कादंबरी तसेच द.मा.मीरासदार यांचे ‘अंगत पंगत ‘या पुस्तकांचा परिचय करून देण्यात आला.
दिनांक ७ जानेवारी रोजी ग्रंथालयात लेखक तुमच्या भेटीला या उपक्रमांतर्गत प्राचार्य डॉ.एम.जी लोणे यांच्या मार्गदर्शनानुसार पुरातत्व शास्त्राचे लेखक तसेच दक्षिण भारताचा इतिहास या पुस्तकाचे लिखाण करणारे प्रा.डॉ. दत्ता हिंगमिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दिनांक ९ जानेवारी रोजी ग्रंथालय विभागातर्फे ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले यात स्पर्धात्मक परीक्षा पुस्तके यावरती भर दिला गेला. दिनांक १० जानेवारी रोजी ग्रंथालय विभागातर्फे सामूहिक वाचन प्रकल्प राबविण्यात आला.
दिनांक ११ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांना ‘आठवणींचे मोती’ हे व्हरा जीसिंग यांचे पुस्तक तसेच ‘माझा साक्षात्कारी हृदयरोग’ हे डॉक्टर अभय बंग यांचे पुस्तक या दोन पुस्तकांचा परिचय करून देण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.जी लोणे आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी ग्रंथालय कर्मचारी तसेच ग्रंथपाल श्याम धारासुरकर व विद्यार्थी यांनी सहभाग घेऊन वाचन पंधरवडा हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला.