सिन्नर : डी पॉल इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये दि. १ डिसेंबर 2023 रोजी विविध वेशभूषा दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी एस. बी. देशमुख सेक्रेटरी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्था व मुख्याध्यापक पाताळेश्वर माध्यमिक विद्यालय पाडळी बोलताना म्हणाले भारत देशात विविध जाती, धर्म व भाषा बोलणारे लोक राहतात तरी त्यांच्यात एकात्मता व बंधुभावाची भावना दिसून येते. विभिन्न संस्कृतीचा मेळ इथे आपल्याला दिसून येतो. आजचे युग हे डिजिटल क्रांतीचे युग आहे. तरी विदेशी लोकांनीही भारत देशाची संस्कृती आत्मसात केली आहे. त्यामुळेच आपल्या देशातील विविध विद्यालयात एकात्मतेचे दर्शन होण्यासाठी विद्यार्थ्यांचा गणवेश समान असतो. यातून एकतेची भावना विकसित होते.
आपल्या देशात विविध धर्माचे लोक एकत्र मिळून सण साजरे करतात. त्यातून राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागते. विद्यार्थ्यांनी सुद्धा हे समजून घेतले पाहिजे की आपण कोणत्याही जातीचे, राज्याचे, धर्माचे, पंथाचे, भाषा बोलणारे असलो तरी अभिमानाने म्हटले पाहिजे मी भारतीय आहे आणि आम्ही सगळे एकच आहोत. फुलांची माळ तयार करतांना आपण वेगवेगळी फुले एकत्र करून माळ बनवल्यानंतर ती आकर्षक बनते. अशा अनेक उदाहरणांमधून त्यांनी एकात्मतेचे दर्शन करून दिले. या प्रसंगी डी पॉल इंग्लिश मेडियम कॉन्व्हेंट हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर सॅन्टो,फादर जेम्स, सौ .योगीता भुजाडी , खाडे भाऊसाहेब ,संस्थेचे पदाधिकारी व विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.