एस. एम. जोशी कॉलेजकडून स्पर्धा परीक्षा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

0

पुणे/हडपसर प्रतिनिधी

रयत शिक्षण संस्थेचे एस. एम. जोशी कॉलेज हडपसर व अमृतवेल ग्रामविकास प्रबोधनी आणि अमृतवेल मिडिया समूह यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, अमृतवेल गव्हर्नन्स विशेषांकाचे प्रकाशन व अमृतवेल गव्हर्नन्स सुपरवुमन यांचा सत्कार समारंभ विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह हडपसर येथे संपन्न झाला. एस. एम. जोशी कॉलेजमधील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील ४२ यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि अमृतवेल गव्हर्नन्स विशेषांकाचे प्रकाशन सहआयुक्त नेहा देशपांडे IRS आणि रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी IAS Retd. यांच्या हस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून नेहा देशपांडे IRS (सहआयुक्त, आयकर विभाग, पुणे) या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून चंद्रकांत दळवी IAS Retd. (चेअरमन, रयत शिक्षण संस्था, सातारा) हे उपस्थित होते. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांना मार्गदर्शन करताना आयकर विभागाच्या सहआयुक्त नेहा देशपांडे यांनी यशाची चतुसूत्री सांगितली. प्रत्येक विद्यार्थ्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करताना निर्धार, कष्ट, वेळेचे नियोजन  आणि संयम यांचा उपयोग आपल्या आयुष्यात केला पाहिजे. सामाजिक बांधिलकी जोपासत विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेमध्ये कार्य केले पाहिजे. आपण समाजाचे देणे लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करून स्पर्धा परीक्षेतील यशाच्या माध्यमातून उंच भरारी घ्यायला पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांनी धीराने त्याला सामोरे गेले पाहिजे. असे मत आयकर विभागाच्या सहआयुक्त नेहा देशपांडे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी IAS Retd. (चेअरमन, रयत शिक्षण संस्था, सातारा) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, दहावी व बारावीनंतर ध्येय निश्चित करण्याची वेळ योग्य असून, स्पर्धा परीक्षेत अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास करून सर्वसामान्य घरातील मुले यशस्वी होत आहेत. त्याचबरोबर अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी एस. एम. जोशी कॉलेजमधील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांमधील अभ्यासिकेस भेट दिली पाहिजे. रयत शिक्षण संस्थेमधील सर्व शाळा, महाविद्यालये व कॉलेजमधील शिक्षणाची दिशा बदलणार असून, येत्या शैक्षणिक वर्षांमध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्स, व कोडिंग असे प्रोफेशनल कोर्सेस सुरू करण्यात येणार असून याद्वारे विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहे. असे मत रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी IAS Retd. यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या पाहुण्यांचे स्वागत प्राचार्य डॉ.सुरेश साळुंखे यांनी केले. तर कार्यक्रमाचे  प्रास्ताविक अमृतवेल मिडिया समूहाचे संपादक धर्मेंद्र पवार यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे चेअरमन डॉ.अतुल चौरे व समन्वयक प्रा.अजित भोसले, अनिता शिंदे मॅडम यांनी केले. 

कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर अमृतवेल मिडिया समूहाच्या सारिका पवार, प्राचार्य दत्तात्रेय जाधव, प्राचार्य झीनत सय्यद, प्राचार्य विठ्ठल तुळजापुरे, प्रा.लालासाहेब खलाटे, उपप्राचार्य प्रो. डॉ. किशोर काकडे, उपप्राचार्य डॉ.संजय जगताप, उपप्राचार्य प्रा.संजय जडे, प्रो. डॉ. एकनाथ मुंढे, प्रो. डॉ. दिनकर मुरकुटे, डॉ.शहाजी करांडे, प्रा. किसन पठाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.नम्रता कदम आणि डॉ.अर्चना पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य डॉ.संजय जगताप यांनी मानले. कार्यक्रमासाठी साधना शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी व एस. एम. जोशी कॉलेजमधील विद्यार्थी व प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here