हडपसर प्रतिनिधी
रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी कॉलेजमधील मराठी विभाग, मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभाग व वैश्विक कला पर्यावरण यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन संकल्प महाराष्ट्राचा आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, लघुपट व माहितीपट निर्मिती, विद्यार्थी कवी संमेलन व गीतगायन स्पर्धा तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मराठी विभाग, मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम विभाग, जयकर ग्रंथालय, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र इतर स्थळांना भेट तसेच पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रो.डॉ.नाना झगडे ( मराठी विभाग, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, हडपसर) उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रो.डॉ.नाना झगडे म्हणाले की, माणूस जन्माला आल्यापासून कोणत्यातरी भाषेमधून व्यक्त होत असतो. भाषा हे संदेशवहनाचे, विचारांचे आदान प्रदान करण्याचे प्रभावी माध्यम आहे. भाषेमधून सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय इतिहास जतन केला जातो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यामुळे भविष्यामध्ये मराठी भाषेला चांगले दिवस येतील. असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना अधिक चालना मिळावी यासाठी वाचन संकल्प महाराष्ट्राचा आणि मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हा उपक्रम निश्चितच मोलाचा आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर त्यांच्यातील कलागुणांना अधिक वाव देण्यासाठी महाविद्यालयीन पातळीवर विविध स्पर्धांचे आयोजन केल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, डॉ. बाळासाहेब माळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा.शुभम तांगडे (जैन), प्रा.धीरेंद्र गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ.अतुल चौरे, पाहुण्यांची ओळख डॉ.शीतल कोरडे, कार्यक्रमाचे आभार डॉ.संदीप वाकडे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.नम्रता कदम यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.