जासई विद्यालयात गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

0

उरण दि 21(विठ्ठल ममताबादे ) : रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि .बा पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई, तालुका उरण जिल्हा रायगड .या शैक्षणिक संकुलात 20 डिसेंबर रोजी या विद्यालयाचे सल्लागार समितीचे सदस्य तसेच बेलपाडा गावचे रहिवासी, शिक्षण प्रेमी थोर देणगीदार  मधुकर पाटील यांनी आपला वाढदिवस गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा केला.  मधुकर पाटील यांचा 58 वा वाढदिवस होता त्या निमित्ताने त्यांनी ज्या शाळेत आपण शिक्षणाचे धडे घेतले त्या शाळेच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्या शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दप्तर,गणवेश ,कंपास पेटी,लेखन पॅड,  तसेच बूट इत्यादी प्रकारचे शैक्षणिक साहित्य वाटप केले.

        या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे अध्यक्ष, भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री, कामगार नेते  सुरेश पाटील हे लाभले होते त्यांनी  मधुकर पाटील यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे अभिनंदन करून वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या ,तसेच शाळेचे चेअरमन  अरुण जगे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या .रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर व या शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य  अरुण घाग यांनी या शाळेतील विद्यार्थ्यांना मदत केल्याबद्दल मधुकर पाटील यांचे शाळेच्या वतीने विशेष आभार मानून त्यांना शुभेच्छा दिल्या. रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक  नुरा शेख  यांनी  मधुकर पाटील यांच्या विषयी कौतुक करताना म्हटले की, पैशाच्या जोरावर आपला वाढदिवस थाटामाटात साजरा करणारे अनेक धनिक समाजात भेटतील पण गरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाच्या कामी खर्च करणारे  मधुकर पाटील हे खरे शिक्षण प्रेमी आहेत. ते एक धडाडीचे कामगार नेते आहेत . भारतीय मजदूर महासंघाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत तसेच अनेक सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच हिरीरीने सहभाग असतो.या कार्यक्रमासाठी  मधुकर पाटील   यांच्या सौभाग्यवती प्रभावती पाटील, सुनबाई प्रतिक्षा पाटील व त्यांचे कुटुंबीय, विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका पाटील एस.एस.,पर्यवेक्षिका म्हाञे एस.सी,उत्कृष्ट समालोचक नितेश पंडित, सर्व शिक्षक ,शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here