पुणे प्रतिनिधी : “भारतामध्ये हजारो वर्षांपासून परंपरेने विकसित झालेल्या ज्ञान प्रणालींची समृद्ध परंपरा पाहायला मिळते आहे, ही ज्ञान परंपरा समाजाचा भौतिक विकास तर करणारी होतीच पण ती व्यक्तीला नैतिक अधिष्ठान देणारी ,कुटूंब संस्थेला व समाजाला एकसंध बांधणारी सुद्धा होती.ही भारतीय ज्ञान परंपरा विध्वंसक नव्हती तर विवेकशील होती.” असे प्रतिपादन डॉ.धनंजय भिसे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि:शाल विभाग आणि मु.सा. काकडे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या निमित्ताने केले.
डॉ.भिसे पुढे म्हणाले ” ज्ञानपरंपरेमध्ये सहिष्णूतेची व समृद्ध संस्कृतिक बीजे पाह्यालाा मिळतात.या ज्ञानपरंपरेने तत्त्कालिन समाजाचा सर्वांगीण विकास केलेला आहे.भारतीय ज्ञान परंपरेचे महत्त्व अनेक स्तरांवर आहे. या परंपरेने केवळ भारतीय समाजाबरोबरच जागतिक विचारसरणीवरही महत्त्वपूर्ण प्रभाव टाकलेला आहे असे अभ्यासाअंती दिसते. जी साहित्य,कला, शास्त्र,भाषा ,वेद,उपनिषधे,तत्त्वज्ञान, विज्ञान, गणित, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये समृद्ध आहे. त्यामुळे भारतीय ज्ञानपरंपरा ही केवळ शिक्षण व्यवस्थेतून विद्यार्थी ,शिक्षकापुरती मर्यादित न रहता तर प्रत्येक कुटुंबातून तिचा व्यवहारामध्ये वापर केला पाहिजे.तरच येणाऱ्या काळात भारत हा जगात महासत्ता देश म्हणून ओळखला जाऊ शकतो.” डॉ.बाबासाहेब जयकर ही व्याख्यानमाला ही प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.याप्रसंगी मंचावर प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.निलेश आढाव इत्यादी मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी भारतीय ज्ञान परंपरेचे महत्त्व विशद करून डॉ.बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचा इतिहास श्रोत्यांसमोर मांडला. डॉ. प्रसाद जोशी यांनी १७/०३/२०२५ रोजीच्या पुष्पात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर चिंतनशील मांडणी करुन सावरकरांचा वैज्ञानिक दृष्टिकोन स्पष्ट केला.. तर तिसऱ्या पुष्पात दि. १९/०३/२०२५ रोजी प्राचार्य डॉ. विजय केसकर यांनी ‘स्वामी विवेकानंद यांचे कार्य” या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण आणि चिंतनीय अशी मांडणी केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.निलेश आढाव यांनी केले तर आभार डॉ.जया कदम यांनी मांडले. बहिशाल मंडळ अंतर्गत संपन्न झालेली तीन दिवशीय डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, मा. सचिव सतीश काकडे, अंतर्गत गुणवत्ता सुधार योजनेचे समन्वयक डॉ. संजू जाधव, डॉ. जगन्नाथ साळवे, डॉ. नारायण राजुरवार, डॉ. श्रीकांत घाडगे, डॉ. आदिनाथ लोंढे व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींनी प्रयत्न घेतले.