येवला : सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था सिन्नर येथील महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक संकुलात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षापासून महिला सीनियर महाविद्यालयास १५ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्र शासनाच्या उच्च तंत्र शिक्षण मंत्रालय मुंबई यांची अंतिम मान्यता मिळाली.
या संस्थेची स्थापना २१ मार्च १९६७ रोजी झाली. त्यावेळी समाजातील विडी कामगार, शेतकरी, शेतमजूर यांनी एकत्र येऊन लोंढे गल्ली सिन्नर येथे भद्रकाली मंदिरात शाळेची सुरुवात केली.त्यानंतर स्वर्गीय आमदार सूर्यभानजी गडाख नाना यांच्या मदतीने शाळेला शासकीय भूखंड मिळाला आणि खऱ्या अर्थाने शैक्षणिक संकुलाच्या विकासाला प्रारंभ झाला.
संस्था स्थापनेपासून ते आत्तापर्यंत जवळपास ५५ वर्षात समाजातील अनेकांनी संस्थेवर प्रतिनिधित्व केले. अतिशय जबाबदारीने संस्था विकासाची जबाबदारी स्वीकारली. समाजाचे सामान्य लोकांचे शैक्षणिक संकुल म्हणून सर्वांनीच अथक प्रयत्न केले. त्यामुळेच शैक्षणिक संकुलाचा विकास होत राहिला. आज या शैक्षणिक संकुलात जवळपास ५० वर्ग खोल्या (RCC) आहेत. त्यात संस्था कार्यालय, विद्यालय कार्यालय, संगणक कक्ष, ७ वर्ग डिजिटल, स्वतंत्र ग्रंथालय, अद्ययावत विज्ञान प्रयोग शाळा, स्वतंत्र क्रीडा विभाग, मुक्त विद्यापीठ कार्यालय, MCVC कार्यालय आहे.
आज सिन्नर नागरी औद्योगिक नगरी म्हणून संपूर्ण देशात ओळख निर्माण करत आहे. या नगरीला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. औद्योगिक क्षेत्रात प्रचंड वाढ झाली आहे. व्यापार, उद्योगांचा विकास होत आहे. दळणवळण व्यवस्था प्रचंड वेगाने वाढली आहे. संपूर्ण भारतातून अनेक उच्चशिक्षित, कुशल, अकुशल कामगार आज सिन्नर नगरीत वास्तव्यास आहे. याची ओळख भविष्यात धावपळीचे शहर म्हणून होईल. पर्यायाने शहराची लोकसंख्या वाढली. आज सिन्नर शहर सर्व बाजूंनी वाढले आहे. त्यातून शैक्षणिक गरजाही वाढल्या आहेत.
या परिस्थितीचा विचार करून जून २०२४ मध्ये आपल्या संकुलात महिला महाविद्यालय असावे असा मा. संस्था चालकांनी निर्णय घेतला. त्यानुसार कामास सुरुवात झाली. सिन्नर शहरासाठी आकृतीबंधात मंत्रालय मुंबई येथून बिंदू मंजूर करण्यात आला. त्यानंतर एसएनडीटी विद्यापीठ व मंत्रालय मुंबई येथे पाठपुरावा केला. आज अंतिमतः महिला सीनियर महाविद्यालयास मंजुरी मिळाली.
सिन्नर तालुक्यात पहिलेच महिला महाविद्यालय मंजूर झाले. या महाविद्यालयात या शैक्षणिक वर्षापासून FYBA व FYBCOM चे वर्ग सुरू होत आहे. याशिवाय पुढील वर्षात BSC, BBA, BCA इ. वर्ग चालू करण्याचे संस्थेचे नियोजन आहे. याशिवाय वेगवेगळ्या विषयांनुसार पदवीत्तोर पदवी(PG) शिक्षणक्रम सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. या महिला महाविद्यालयातून मुलींना/महिलांना आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे राहता यावे यासाठी यूजीसी मार्फत कौशल्य विकास अंतर्गत काही कोर्सेस सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे.
आज या शिक्षण संस्थेत बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र, व्यवसाय अभ्यासक्रम अशा वेगवेगळ्या विभागात जवळपास ३५०० विद्यार्थी शिक्षण घेतात. यातही मुलींचे प्रमाण जवळपास ६०% पेक्षा जास्त या संकुलात जवळपास २० ते २५ खेड्यांमधून मुले येतात.
एसएनडीटी मुंबई विद्यापीठ अंतर्गत महिला महाविद्यालय हे सिन्नर तालुक्यातील पहिलेच महाविद्यालय आहे. याचा सिन्नर तालुक्यातील तमाम जनतेला आनंद होईल. याची आम्हाला खात्री आहे.
सिन्नर तालुक्यामध्ये हे महिला महाविद्यालय सुरू करणे कामी सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. नामदेव लोंढे, सेक्रेटरी मा. नामदेव लोणारे व संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांनी वेळोवेळी मार्गदर्शन तसेच पाठपुरावा केला. संकुलाचे प्राचार्य, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य मिळाले. संस्था सर्वांचे मनस्वी अभिनंदन करत आहे.