येवला प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही शाळा सुटली की शेतात जाऊन कांदे लागवडीपासून ते काढणीपर्यंत आणि पाणी देण्यापासून तर स्वयंपाकापर्यंतची सर्वच कामे पार पाडावी लागतात मात्र जिद्द,शिकण्याची उमेद आणि अभ्यासाची तळमळ असली की यश नक्की मिळते…! हे ग्रामीण व शेतकरी कुटुंबातील विद्यार्थीनीनी दाखवले आहे.वर्षभर कॉलेज करून रोज शेतीकामात आई-वडिलांना मदतीचा हात देतानाच कधी पायी तर कधी सायकलवर शाळेत येत सावरगाव विद्यालयाच्या विद्यार्थिनी टॉपर आल्या असून पहिले पाच क्रमांक विद्यार्थिनींनीच मिळविले आहे.
शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या सावरगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक व एम.जी.पाटील उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८६ टक्के लागला आहे.सकाळी कॉलेज,दुपारी शेतीकामात आई-वडिलांना मदत आणि सायंकाळी पुन्हा स्वयंपाक अन घराची जबाबदारी…या कामांचे ओझे वर्षभर पेलवूनही शेतकऱ्याच्या लेकींनी मिळवलेले यश कौतुकाचे ठरत आहे.अतिशय प्रतिकूलतेवर मात करत शेती कामाला मदत करतानाचा नियमितपणे अभ्यासाची जवाबदारीही निभावत मोनाली गायकवाड हिने ८१.५० टक्के गुण मिळवत केंद्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे.अनकुटे येथून सायकलवर अप डाऊन करत प्रतिकूलतेवर मात करत मिळविलेल्या तिच्या उत्तुंग यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सावरगाव येथील मयुरी भुरुक ७८.६७ टक्के मिळवून द्वितीय तर अनकुटे येथील पूनम गायकवाड हिने ७६ टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.संध्या काटे हिने (७५.८३ %) चतुर्थ तर प्रतीक्षा चव्हाण (७५.३३%) हिने पाचवा क्रमांक मिळवला.विशेष म्हणजे कुटुंबाची जबाबदारी पेलताना आई- वडिलांच्या खांद्याला खांदा लावून या मुलींनी कधी शेती कामाची तर कधी घरची जबाबदारी स्वीकारत अकरावी पासूनच यशाला गवसणी घालण्याचा चंग बांधला व यश मिळवले आहे.
बारावीचे वर्ष असल्याने आई-वडिलांना मदतीचा हात देत ती घरातील आईच्या सर्व जबाबदाऱ्या पूर्ण करायची.शिवाय उरलेल्या वेळात अभ्यास करून हे यश त्यांनी मिळविले आहे.कधी पायी तर कधी शाळेत सायकलवर रोज यायचं..शेतीत व घरात मदत करून अभ्यासाची जवाबदारी पेलवत या मुलींनी हे यश मिळवले आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे जनरल सेक्रेटरी प्रमोददादा पाटील, सहसचिव प्रविणदादा पाटील,युवा नेते संभाजीराजे पवार,नगरसुलचे माजी सरपंच प्रसाद पाटील आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.विद्यार्थ्यांना प्राचार्य एम.एम.अलगट,पर्यवेक्षक आर.जी.पैठणकर,
गजानन नागरे,वाय.ए.दराडे,पोपट भाटे,अंजना पवार,उमाकांत आहेर,संतोष विंचू,योगेश भालेराव,कैलास मोरे,योगेश पवार,रविंद्र दाभाडे,संजय बहीरम,भाग्यश्री सोनवणे,प्रमोद दाणे,उज्वला आहेर,लक्ष्मण माळी,रोहिणी भोरकडे,सगुना काळे,सविता पवार,अर्चना शिंदे,विकास व्यापारे,मयुरेश पैठणकर,रोहित गरुड,निलेश व्हनमाने,सागर मुंढे,मच्छिंद्र बोडके,लक्ष्मण सांगळे आदीचे मार्गदर्शन लाभले.
“आमची संस्था ५० हून अधिक वर्षापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सक्षम करण्याचे काम करत आहेत.विद्यार्थ्यांची हलाखीची परिस्थिती असली तरी अशा स्थितीतही ज्ञानदानाचे पवित्र कार्य आमच्या शिक्षकांनी जपले आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थी होतकरू असल्याने त्यांची तयारी करून घेतली जाते.गुणवंत विद्यार्थ्यामूळे विद्यालयाचा नावलौकिक झाला असून यामुळे पालकांचा प्रवेशासाठी विद्यालयाकडे ओढा वाढला आहे.”
–प्रमोददादा पाटील,जनरल सेक्रेटरी,शिक्षण प्रसारक मंडळ,नगरसुल