सेंट पॉल्स हायस्कूलचा पालक मेळावा उत्साहात संपन्न

0

पैठण,दिं.२०.(प्रतिनिधी) : पैठण औद्योगिक वसाहत मधील सेंट पॉल्स  हायस्कूलचा पालक मेळावा मोठ्या उत्साहात गुरूवार (ता.१९) रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न झाला. पैठण औद्योगिक परिसरातील सेंट पॉल्स हायस्कूलचा पालक मेळावा तसेच बक्षीस वितरणाचा समारंभ गुरुवार दिनांक १९ डिसेंबर रोजी सायंकाळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी औरंगाबाद धर्मप्रांताचे बिशप बर्नार्ड लॅन्सी पिंटो यांनी भूषविले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध उद्योजक व सी.ए. निशांत अग्रवाल यांचेसह औरंगाबाद धर्मप्रांताचे विकर जनरल तथा चान्सलर रे. फा. डॉ. वलेरियन फर्नांडीस, एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक  पोलिस निरीक्षक ईश्वर जगदाळे पाटील, पैठण नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष सूरज लोळगे व छ. संभाजीनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक जेम्स अंबिलढगे यांची उपस्थिती होती. या निमीत्ताने शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे व प्रशस्तीपत्रे देवून गौरवविण्यात आले.

याप्रसंगी रंगारंग व वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाने सर्व उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी विविध स्पर्धेत भाग घेतलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे,

स्मृतिचिन्ह व बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात औरंगाबाद धर्मप्रांताचे बिशप बर्नार्ड  लॅन्सी पिंटो यांनी शिक्षक  व पालकांनी त्यांच्या विद्यार्थी व पाल्यांतील सुप्त गुणांना ओळखून पुरेपूर वाव देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याचे सुचविले. प्रसिद्ध उद्योजक निशांत अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तीन गोष्टी सांगत कायम कार्यरत राहूनच यशाची चव चाखावी असा उपदेश केला. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे पाटील तसेच माजी नगरसेवक जेम्स अंबिलढगे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

शाळेचे संस्थापक व संचालक रे. डॉ. वलेरियन फर्नांडीस यांनी शाळेच्या वाटचालीत किती कष्ट पडले याचे विवेचन केले. शाळेचेच माजी विद्यार्थी असलेले पैठणचे माजी नगराध्यक्ष सुरज लोळगे यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीतील यशात शाळेचे मोठे योगदान असल्याचे प्रतिपादित केले. या निमीत्ताने शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी, शाळेस वॉटर प्युरिफायर आर ओ सिस्टीम भेट दिल्याबद्दल त्यातील प्रतिनिधींचे बिशप व  प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.  पालकांसाठी आयोजिलेल्या शिस्तबद्ध व सर्वसमावेशक सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी काही मराठमोळी नृत्ये , पंजाबी नृत्य व सिनेसंगिताच्या तालावरील नृत्ये सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमास विद्यार्थी व पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद लुटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी तर आभार प्रदर्शन अब्रारुल हक यांनी केले. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी यांनी सहकार्य केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर बांगर , पर्यवेक्षक बाळासाहेब थोटे, अमोल बोबडे,स्वामी बोबडे, सुंदरलाल आडसुळ,विद्यापु कुलकर्णी, वैशाली माळवे,शिला मनोवर सह शिक्षकांनी पुढाकार घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here