नाशिक प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे ६१वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन २८ व २९ डिसेंबर २०२४ रोजी थोरमोठे लॉन्स, ओंसा रोड, लातूर येथे होणार असून या शैक्षणिक संमेलनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार असून नुकतेच महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी. देशमुख, पदाधिकारी ए.के. खालकर, महेंद्र जोंधळे, भागिनाथ घोटेकर, अनिल निकम, जितेंद्र लोंढे यांनी दादासाहेब भुसे यांची भेट घेऊन त्यांना आमंत्रित केले आहे. या शैक्षणिक संमेलनात महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा,पश्चिम महाराष्ट्र येथील ३६ जिल्ह्यातून सहा ते सात मुख्याध्यापक उपस्थित राहणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र राज्याचे मुख्याध्यापक संघाचे सचिव एस.बी. देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रक्द्वारे दिली आहे. .
या संमेलनासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षण मंत्री दादाजी भुसे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, शिक्षक आमदार किशोर दराडे, शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार सत्यजित तांबे, शिक्षण आयुक्त सुसज मांढरे, शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, राज्य मंडळाचे अध्यक्ष गोसावी हे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनात विविध शोधनिबंध सादर होणार असून नवीन शैक्षणिक धोरण, पाचवी ते आठवी विद्यार्थी अनुत्तीर्ण करण्याचा संदर्भ, विनाअनुदानित तुकड्यांना मान्यता देणे, अनुदान देणे, शहरी व ग्रामीण भागासाठी विद्यार्थी अट शिथिल करणे, शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देणे, विद्यार्थी गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करणे या विषयांवर खुली चर्चा होणार आहे. या संमेलनासाठी प्रमुख व्याख्यात्यांचे व्याख्यान सुद्धा आयोजित करण्यात आलेले आहे.
अशी माहिती अखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महा मंडळा चे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी, अध्यक्ष के. एस. ढोमसे, वसंत पाटील, अशोक मोरे, प्रकाश देशमुख, एस. आर. कदम, सतीश जगताप, विलास भारसाखरे, संजय शिप्परकर, जे.एस. पैठणे, मोहन सोनवणे, अशोक पारधी, नंदकुमार बारावकर यांनी महाराष्ट्रातील मुख्याध्यापकांना या शैक्षणिक संमेलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.