सिन्नर :
नव शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला उन्हाळी सुट्ट्या संपल्यावर १५ जूनला नव शैक्षणिक वर्षाची सुरुवात व नव्या बालकांचे पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयात स्वागत करण्यात आले. नव्याने प्रवेश घेऊन पाचवीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या चिमुकल्यांचे मोठ्या उत्साहाने स्वागत करण्यासाठी विद्यालयाची लगबग सुरू झाली. वर्गाची सजावट करून या विद्यार्थ्यांना वाजत गाजत त्यांच्या वर्गापर्यंत पोहोचविण्यात आले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक व बालविज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी -एस. बी. देशमुख यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. विद्यालयातील लेझीम पथकाने या नव विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करून शाळेच्या प्रांगणात मिरवणूक काढून फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत केले. विद्यालयातील वातावरण व त्या वातावरणाशी समरस होण्यासाठी या विद्यार्थ्यांची मानसिकता खेळीमेळीच्या वातावरणात तयार करण्यात आली. त्यांना शाळेचा परिसर व शिस्त याबद्दल माहिती देऊन मोठ्या विद्यार्थ्यांनी त्यांना आपलेसे करून त्यांच्याशी आपुलकीची भावना ठेवावी असे मुख्याध्यापकांनी सांगितले. शाळेच्या पहिल्या दिवशी या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. देवी शारदेच्या आशीर्वादाने आपल्या नव शैक्षणिक वर्षाची सुरुवात होवो यासाठी बालकांनी देवी सरस्वतीला वंदन करून देवी सरस्वतीचे श्लोक गायन केले.
शालेय परिपाठाच्या सुरुवातीस प्रत्येकाने आपला परिचय चिमुकल्या गोडवाणीतून करून दिला. तुम्ही आम्हा आधार या उक्ती प्रमाणे सर्वांनी मोठ्या उत्साहात नवचैतन्याने, प्रसन्न वातावरणात सर्वांचे स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष टि.के.रेवगडे, बी. आर. चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, आर. टी. गिरी, एम. एम. शेख, सविता देशमुख, सी. बी. शिंदे, के. डी. गांगुर्डे, एस.डी पाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी थोरे, उपस्थित होते.