कोपरगाव : शालेय शिक्षण घेतांना विद्यार्थ्यांना शिक्षक मेहनतीने घडवतात,संस्कार करत असतात.अशा वेळी पालकांनी शाळेच्या उपक्रमात सहभागी व्हावे तरच विद्यार्थींचे गुणकौशल्यास वाव मिळेल. तेव्हा पालकांनी सकारात्मकता ठेवून शाळेला सहकार्य करावे आवाहन गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी केले.
श्रीमान गोकुळचंदची विद्यालयात निसर्ग मंडळ आणि महाराष्ट्र हरितसेना यांचे वतीने जागतिक मृदू(माती) दिनाच्या निमित्ताने आयोजित रंगभरण व निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला होता.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी शबाना शेख बोलत होत्या. या प्रसंगी वनक्षेत्रपाल निलेश रोडे,माजी विद्यार्थी व सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव दिलीप अजमेरे होते.
या प्रसंगी वनक्षेत्रपाल निलेश रोडे म्हणाले, अधिकाधिक झाडे लावणे त्यांचे संगोपन करणे महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांचा सहभाग महत्वाचे आहे.
महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल मान्यवरांच्या हस्ते सुशांत घोडके यांचा सन्मान केला गेला.महाराष्ट्र शासन छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार विजेते सुशांत घोडके म्हणाले, स्वच्छता, जलसंवर्धन, वृक्षारोपण हे निरंतर चालणारे कार्य आहे.मनुष्य,पशू-पक्षांना घातक नायलॉन (मांजा) वापरणे टाळून मुले व तरुणांनी साधा पारंपरिक धागा वापरून पतंगबाजी करावी असे आवाहन केले.
अध्यक्षपदा वरुन विदयार्थीना मार्गदर्शन करतांना संस्थेचे सचिव दिलीप अजमेरे म्हणाले की आज पर्यावरण संतुलन राहीले नाही तर पुढे आपल्याला पेट्रोल पंपासारखे ऑक्सिजन पंप सुरु करावे लागतील.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण करुन चित्रकला व निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले.कलाशिक्षक व निसर्ग मंडळाचे प्रमुख अतुल कोताडे यांनी या स्पर्धा चे संयोजन केले. सुत्रसंचलन अनिल अमृतकर यांनी तर आभार पर्यवेक्षिका उमा रायते यांनी केले.