समृद्धी महामार्ग इंटरचेजच्या नावात कोपरगावचा नामोल्लेखच टाळला ?

कोण करतंय कोपरगावकरांच्या भावनांशी तडजोड?- सुधाकर रोहोम

0

कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गाला जमिनी कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. या समृद्धी महामार्गाचे इंटरचेज कोपरगाव तालुक्यात असले तरी या शिर्डी इंटरचेजच्या नावातून कोपरगावचे नावच गायब आहे. त्याबाबत कोपरगाव तालुक्यातील स्थानिक भाजपा नेत्यांनी हाताची घडी, तोंडावर बोट अशी भूमिका घेतल्यामुळे त्यांना कोपरगावच्या अस्मितेबाबत किंवा कोपरगावच्या जनतेच्या भावनांबद्दल व कोपरगावच्या विकासाबाबत काही देणं घेणं नाही का? मुग गिळून गप्प बसण्याची भूमिका घेऊन कोपरगावकरांच्या भावनांशी कोण तडजोड करतंय? असा प्रश्न कोपरगाव तालुक्यातील प्रत्येक नागरिकांच्या मनाला पडला असल्याचे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 

दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात रोहोम यांनी पुढे असे म्हटले आहे कि, यापूर्वीही कोपरगावकरांवर अशा प्रकारचा अन्याय होऊन कोपरगावकरांनी खूप काही सोसले आहे आणि आजही सोसत आहे. शिर्डी देवस्थान राहाता तालुक्यात जावू देणार नाही अशी कणखर भूमिका तात्कालीन लोकप्रतिनिधींनी घेऊन राहाता तालुक्यात चाललेले शिर्डी देवस्थान कोपरगाव तालुक्यातच थांबवले असते तर कोपरगाव शहर व तालुक्याची विकासाच्या बाबतीत परिस्थिती निश्चितपणे वेगळी असती. महसूल यंत्रणा कोपरगाव तालुक्यातच राहिली असती व कोपरगावचा महसूल निश्चितपणे वाढला जाऊन इतर विकसित शहरांप्रमाणे कोपरगाव देखील विकसित शहर म्हणून ओळखले गेले असते. मात्र कोपरगाव तालुक्यातील शिर्डी देवस्थान राहाता तालुक्यात गेल्यामुळे आज विकासाच्या बाबतीत राहाता तालुका केवळ शिर्डी देवस्थानामुळे कोपरगाव तालुक्याच्या किती तरी पुढे निघून गेला आहे. 

आज पुन्हा अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या समृद्धी महामार्गाला जमिनी कोपरगाव तालूक्यातील शेतकऱ्यांच्या गेल्या, ३० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग कोपरगाव तालुक्यातील ११ गावांतून जातो, या समृद्धी महामार्गाचे इंटरचेंज देखील कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात आहे. त्या इंटरचेंजच्या नावात शिर्डी देवस्थानाचे नाव आहे याचा कोट्यावधी साईभक्तांसह कोपरगावकरांना मनस्वी आनंद झाला आहे मात्र या नावाबरोबरच कोपरगाव तालुक्याचे नाव असते तर कोपरगावकरांना अजूनच आनंद झाला असता. परंतु या नावात कोपरगाव तालुक्याचा नामोल्लेख नसल्याची बाब कुठेतरी कोपरगावकरांच्या अंतर्मनाला खटकत आहे. कोपरगावकरांच्या अंतर्मनातील हि भावना आ.आशुतोष काळे यांना उमगली. त्याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करून शिर्डी इंटरचेजच्या नावाबरोबरच कोपरगावचा देखील उल्लेख असावा अशी लेखी मागणी देखील केली आहे. मात्र विरोधी पक्षाचा आमदार असल्यामुळे त्यांच्या या मागणीकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

 रविवार (दि.११) रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नागपूर ते कोपरगावपर्यंत या समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले.

ज्यावेळी शिर्डी देवस्थान कोपरगाव तालुक्यातून राहाता तालुक्यात गेले त्यावेळी देखील ह्याच मुग गिळून गप्प राहण्याच्या भूमिकेची मोठी किंमत कोपरगाव तालुक्याला मोजावी लागत आहे. व आज देखील समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजच्या नावात कुठेही कोपरगावचा उल्लेख नसतांना देखील घेतलेली बघ्याची भूमिका काहीसी संशयास्पद वाटते. जर या समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंजच्या नावात शिर्डी बरोबरच कोपरगावचे नाव जोडले गेले तर ते नाव देशाच्या पटलावर येणार आहे याचा कोपरगावकरांना विशेष आनंद होणार आहे. परंतु असे होतांना दिसत नसून याबाबत कोपरगावच्या स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी घेतलेली भुमिका कोपरगावकरांना कदापि मान्य होणार नाही. कोपरगावचे स्थानिक भाजप नेते हि भूमिका त्यांच्यावर असलेला राजकीय दबाव किंवा राजकीय तडजोडीपोटी अथवा त्यांच्या स्वार्थासाठी करीत असतील मात्र त्यामुळे कोपरगावकरांच्या पदरात काय पडणार आहे. याचे उत्तर या मुग गिळण्याची भूमिका घेतलेल्या नेत्यांकडे नसून हा तर कोपरगावकरांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here