नाशिक, दिनांक 16 एप्रिल, : अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचानाम्याचे 50 टक्के काम पूर्ण झालेले असून, येत्या दोन दिवसांत उर्वरित पंचनामे तातडीने पूर्ण करावेत, असे निर्देश राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत.
आज दिंडोरी तालुक्यात गारपीटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची पालकमंत्री दादा भुसे यांनी केली पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. या पाहणीच्या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, तहसीलदार पंकज पवार , गट विकास अधिकारी नम्रता जगताप, तालुका कृषी अधिकारी विजय पाटील, माजी आमदार धनराज महाले, अनिल कदम यांच्यसह शेतकरी उपस्थित होते.
पालकमंत्री दादाजी भुसे यांनी आज दिंडोरी तालुक्यातील कुरनोली, मोहाडी, खडक सुकेने,चिंचखेड,जोपुळ परिसरातील द्राक्ष बाग व इतर पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. पाहणी दरम्यान काही शेतकऱ्यांनी द्राक्ष बागेवर केलेल्या अच्छादनामुळे त्यांचे गारपीटीमुळे होणारे नुकसान टळल्याचे निदर्शनास आले. पालकमंत्री दादाजी भुसे यांनी शेतकऱ्यांच्या या प्रयोगशीलतेचे कौतुक करीत येणाऱ्या काळात शासनस्तरावरही द्राक्ष बागांचे नुकसान टाळण्यासाठी संरक्षित अच्छादनासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येतील, असेही भुसे यांनी यावेळी सांगितले.
पाहणी दरम्यान ज्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती सातबारावर पिककर्जांची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांकडून जिल्हा सहकारी बँकेने पीककर्जाची सक्तीने वसूली करू नये, असे निर्देशही यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्हा सहकारी बँक अधिकाऱ्यांना दिले.