नाकाच्या आतील बाजूस असलेल्या त्वचेला सायनस असे म्हणतात किंवा सायनस म्हणजे नाकाला जोडलेली हाडातली पोकळी. एखाद्या घरात जशा खोल्या असतात तसे नाकाला सायनस असतात. नाकाच्या दोन्ही बाजूंना चार-चार अशा एकूण आठ पोकळया असतात. यात हवा असते. मध्यकर्णातून निघणारी नळीही नाकात उघडते (कानाघ नळी). म्हणूनच सर्दीपडशात सायनसदुखी किंवा कानदुखी होऊ शकते.
कारणे
नाकातील व तोंडातील लाळ ग्रंथींनी सायनस वेढलेले असते. जेव्हा माणसाला सर्दी किंवा संक्रमण (इन्फेक्शन) होते तेव्हा सायनसच्या भागातून शेंबुड जास्त प्रमाणात वाहू लागतो व सायनसला सुज येते. सायनसची निचरा पद्धत अडखळते आणि शेंबुड नाकात साठायला लागतो. अशा वेळी जिवाणू, बुरशी आणि विषाणू तेथे वाढू लागतात व सायनसायटिस होतो.
लक्षणे
सायनसायटीस मुळे वेगवेगळ्या वयाच्या लोकांवर वेगवेगळे परिणाम होतात.
मुलांमध्ये साधारण सर्दी पहायला मिळते, ज्यात नाक वाहणे किंवा सुजणे आणि किंचित ताप ही लक्षणे दिसून येतात. बाळाला सर्दीनंतर ३-४ दिवसांनी ताप येतो तेव्हा सायनसायटीसची लक्षणे सुरु होतात, किंवा काही इतर रोगांची लक्षणे जसे ब्रॉन्कॉयटीस्, न्यूमोनिया किंवा कानाचे संक्रमण असु शकते.
मोठ्यांमध्ये, सायनसायटीसची सामान्य लक्षणे म्हणजे दिवसाचा कोरडा खोकला जो आठवडाभरात देखील कमी होत नाही व ताप, दात दुखणे, कान दुखणे किंवा जबड्याची हाडे दुखणे ही लक्षणे वाढत जातात. इतर काही लक्षणे जसे पोट खराब होणे, मळमळ, डोकेदुखी आणि डोळ्यांच्यामागे दुखणे, इत्यादी दिसायला लागतात.
काही सामान्य उपाय
सायनसायटीस हा सामान्य असून त्यावर सोप्या रितीने उपचार करता येतो. जेव्हा मुलाला ७ दिवसापेक्षा जास्त दिवस सर्दी असेल व तिचे १० दिवसांनी तापात रुपांतर झाले तर त्वरित वैद्यकिय आधिका-याला दाखवावे वा दवाखान्यात न्यावे.
तुमच्या घराच्या आजूबाजूचे वातावरण स्वच्छ ठेवा आणि सायनसायटीस होईल अशा प्रकारची परिस्थिती किंवा संक्रमण टाळा.
श्रवणयंत्रे
कानाला ऐकू येण्याची क्षमता कमी झाली असेल तर श्रवणयंत्राचा उपयोग होऊ शकतो. मात्र अंतर्कर्णाचा शंख खराब झाला असेल किंवा त्याची चेता-नस किंवा मेंदूचा भाग सदोष असेल तर श्रवणयंत्रांचा उपयोग होत नाही. यासाठी पूर्ण तपासणी करूनच श्रवणयंत्रे द्यावी लागतात.
श्रवणयंत्राचे मुख्य प्रकार
1. कानामागे बसवायचे श्रवणयंत्रयाचा मुख्य भाग कानामागे असतो. स्पीकर किंवा आवाजाची नळी कानात बसवलेली असते. या दोन्ही भागाला जोडणारी एक नळी असते. काही उपप्रकारात नळीऐवजी वायर असते.
मध्यम किंवा गंभीर बधिरतेसाठी ही श्रवणयंत्रे उपयुक्त आहेत. कर्णबधिर मुलांसाठी हीच श्रवणयंत्रे वापरावी लागतात. ही यंत्रे ब-यापैकी टिकाऊ असल्यामुळे परत बदलण्याचा खर्च कमी असतो.
2. कानात बसवायची श्रवणयंत्रेही श्रवणयंत्रे कानाच्या नरसाळयातच बसवतात. म्हणूनच ही प्रत्येक कानाप्रमाणे बनवावी लागतात. या श्रवणयंत्रांमधून एक शिटीसारखा आवाज येण्याची तक्रार येते. हा या श्रवणयंत्रांचा थोडा दोष आहे. ही श्रवणयंत्रे मुख्यत: प्रौढ/तरुण व्यक्तींसाठी वापरली जातात,कारण त्यांचा आकार एकदा केला की बदलावा लागत नाही. मात्र बुचाप्रमाणे आकार असल्याने इतर आवाज ऐकू यायचे थांबतात, हा त्याचा एक दोष आहे.
3. कानाच्या नळीत बसवण्याची श्रवणयंत्रेया श्रवणयंत्राचा स्पीकर किंवा आवाजाची डबी कानाच्या नळीत (जिथे मळ जमतो त्या नळीत) ठेवली जाते. एका वायरने ही बॅटरी व डबी जोडलेली असते. वायरचा आकार लहान असल्याने कान बंद होत नाही. कानात इतर आवाज जाऊ शकतो. हा याचा चांगला गुण आहे. या श्रवणयंत्राच्या आवाजाची गुणवत्ता चांगली असते. या डबीला लागणारी बॅटरी कानामागेच अडकवलेली असते. याशिवाय पूर्णपणे कानात बसवायचेही श्रवणयंत्र उपलब्ध आहे. काही जणांचा मध्यकर्ण खूप खराब असू शकतो. अशा व्यक्तींच्या कानामागच्या हाडाचा वापर ध्वनिवहनासाठी करता येतो. हाडावर बसवायचे श्रवणयंत्र मिळते. (याला बाहा असे नाव आहे.) टेलिफोन किंवा मोबाईल वापरता यावा म्हणून काही श्रवणयंत्रांना आता टेलिकॉईल लावली जाते. आधुनिक श्रवणयंत्रात एकूण पर्याय खूप आहेत. डिजिटल श्रवणयंत्रांची किंमत खूप असते पण आवाजाची गुणवत्ताही चांगली असते. संगणकाच्या मदतीने यांचे टयूनिंग केले जाते. व्यक्तिगणिक बधिरतेची कंपन संख्या बदलते; त्यानुसार डिजिटल टयूनिंग करता येते हा फायदा आहे. मात्र एकदा टयूनिंग करून चालत नाही. यासाठी परत परत तंत्रज्ञाकडे जावे लागते. श्रवणयंत्राची बॅटरी ही वारंवार बदलावी लागते. बॅटरीची शक्ती कमी झाली की आवाज कमी होतो. इतर श्रवणयंत्रांमुळे आजूबाजूचा गोंगाट वेगळा करता येत नाही; डिजिटल श्रवणयंत्रामुळे हे शक्य आहे. पण डिजिटल श्रवणयंत्रांची किंमत काही हजारांपासून लाखापेक्षाही जास्त असू शकते.
याशिवाय आता एफ् एम् प्रकारची श्रवणयंत्रे उपलब्ध होत आहेत. ही श्रवणयंत्रे मुख्यत: कर्णबधिर मुलांच्या वर्गांमध्ये वापरण्यासाठी उपयुक्त आहेत. मात्र अजूनही आपल्या देशात वापरण्यासाठी ही व्यवस्था महाग पडते. नाशिकच्या माई लेले श्रवण विकास केंद्राने यासाठी देशी तंत्रज्ञान विकसित केले आहे.