बारामती 29 : इंडिया आघाडीबाबत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. पश्चिम बंगलासह इतर राज्यातील निवडणुकीवरून शरद पवार यांनी हे विधान केलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. मात्र, हे विधान करताना त्यावरचं उत्तरही शरद पवार यांनी दिलं आहे. शरद पवार यांच्या या विधानाचा आता राजकीय वर्तुळातून तर्कवितर्क लावण्यात येत आहे. बारामतीत मीडियाशी संवाद साधताना पवार यांनी हे विधान केलं. यावेळी त्यांनी रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवरील कारवाईवर बोलण्यास नकार दिला.
इंडिया आघाडीत जागा वाटपावरून मतभेद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आलं होतं. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका नाहीत. निवडणुका येतील तेव्हा काही जागांवर मतभेद होतील. जागा वाटपाचे प्रश्न निर्माण होतील, तेव्हा ज्या पक्षांचा ज्या राज्यात इंटरेस्ट नाही त्यांना आम्ही तिथे पाठवून मार्ग काढू. सध्या मध्यप्रदेश आणि राजस्थानसह चार राज्यांच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत. तिथे एकवाक्यता करण्याचा प्रयत्न होईल. अजून प्रयत्न सुरू केला नाही. वाद होणार नाही याची काळजी घेऊ. आठ दहा दिवसात निर्णय घेऊ, असं शरद पवार म्हणाले.