पैठण,दिं.१२.(प्रतिनिधी): दक्षिण काशीतील श्रीक्षेत्र पैठण येथील कार्तिकी प्रबोधिनी एकादशीच्या शुभ पर्वावर दि. 12 मंगळवारी संतनगर परिसरातील गोदावरीचे जल स्नान करून पहाटेपासुनच भाविकांनी श्र संत एकनाथ महाराजांच्या समाधीसाठी भाविकांनी, वारकऱ्यांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. तसेच गावातील नाथगल्लीतील नाथ वाड्यातील विजयी पांडुरंगाचेही भाविकांनी दर्शन घेतले.
शहरातील झेंडुजी महाराज मठातील विठ्ठल -रुख्मीनीच्या दर्शनासाठी ही भाविकांनी गर्दी केली होती. शहरातील मठ मंदिरातून प्रबोधिनी एकादशी निमित्ताने भजन, प्रवचन, भारुडे, किर्तनासह जागर कार्यक्रम झाले. संतनगर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. या भागात विविध व्यवसायिकांच्या दुकाना थाटल्या होत्या. शहरातील सामाजिक संघटनेंनी भाविकांना उपासाचे पदार्थ मोफत वाटले. एकादशी निमित्ताने मंदिर परिसरात पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तर श्री संत एकनाथ महाराज विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी कर्मचारी व स्वयंसेवकांनी वारकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. पंरपरा व रुढी प्रथेप्रमाणे पैठण तालुक्यातुन गावागावातुन अनेक दिंड्या पायीपीट करीत नाथांच्या समाधी दर्शनासाठी आल्या होत्या. जवळपास दोन लाखापेक्षा जास्त भाविक मोठी वारी समजल्या जाणाऱ्या प्रबोधिनी एकादशीसाठी नाथांच्या दर्शनासाठी आले होते.
चौकट
श्री संत एकनाथ महाराजांचे पंजोबा भानुदास महाराज यांनी कार्तिक शुद्ध एकादशीला शके 1428 म्हणजे ई. स. 1506 ला पांडुरंगाची मुर्ती विजयानगरमधुन पुन्हा वयाच्या 58
व्या वर्षी पंढरपूरला आणली भानुदास महाराजांच्या हस्ते मुख्य मंदिरात पांडुरंगाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या घटनेला दि.12 नोव्हेंबर मंगळवारी कार्तिक शुद्ध एकादशीला 518 वर्ष पुर्ण झाली.