पुणे, मों.श.जाफरी : शेअर दलाल व व्यावसायिक व्यक्तीचे २० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करुन मारहाण करण्याच्या प्रकरणी अखेर कुख्यात गुंड गज्या उर्फ गजानन मारणे याच्यासह १४ जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आली आहे.पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मंगळवारी याबाबत आदेश दिले.
या प्रकरणी गजानन उर्फ गज्या पंढरीनाथ मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), हेमंत उर्फ अण्णा बालाजी पाटील (वय ३९, रा. बुरली, ता. पलूस, जि. सांगली), अमर शिवाजी किर्दत (वय ४६), फिरोज महमंद शेख (वय ५०, दोघे रा. कोडोवली, जि. सातारा), रुपेश कृष्णराव मारणे (रा. शास्त्रीनगर, कोथरुड), संतोष शेलार (रा. कोथरुड), मोनिका अशोक पवार (रा. दापोडी), अजय गोळे (रा. नऱ्हे), नितीन पगारे (रा. सातारा), प्रसाद खंडागळे (रा. तळजाई पठार, पद्मावती), नवघणे यांच्यासह साथीदारांवर मकोका कारवाई करण्यात आली.
भारती विद्यापीठ परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिक व शेअर दलालाचे अपहरण केल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने सोमवारी 4 जणांना अटक केली होती. त्यानंतर गज्या मारणे आणि साथीदार पसार झाले होते. दरम्यान, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.अपहरणाचा हा प्रकार गेल्या आठवड्यात शुक्रवारी आणि शनिवारी घडला होता.