संगमनेर : संगमनेर येथील ओम गगनगिरी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा तथा प्रथितयश डॉ.सतीश वर्पे यांना राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते हेल्थ आयकॉन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. डॉ.सतीश वर्पे यांना हेल्थ आयकॉन पुरस्कार मिळाल्याने संगमनेरच्या वैद्यकीय क्षेत्रात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
मूळचे कनोली तालुका संगमनेर येथील रहिवासी असणारे डॉ.सतीश वर्पे गेली अनेक वर्ष संगमनेरात ओम गगनगिरी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना सेवा देत आहेत. कोविड काळात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते औरंगाबाद येथे आयोजित शानदार कार्यक्रमात डॉ.सतीश वर्पे व त्यांच्या पत्नी सीमाताई वर्पे यांना गौरवण्यात आले. यावेळी बोलताना आमदार अशोक चव्हाण म्हणाले की डॉक्टरची पदवी मिळवल्यानंतर रुग्ण आपल्याकडे येतात असे नाही तर सेवा देताना रुग्णांमध्ये आपण जो विश्वास निर्माण करतो त्यामुळे लोक आपल्याकडे येतात. अनेकदा आपल्या चांगल्या बोलण्यामुळे अनेकजण बरेही होतात. कोविडचा काळ आपण सर्वांनी अनुभवला तो काळ खूप कठीण होता. भीतीदायक परिस्थिती त्यावेळी होती. सुरुवातीला रेमडेसिव्हीर इंजेक्शन भारतात मिळत नव्हते. कशा पद्धतीने उपचार करायचे असे अनेक प्रश्न डॉक्टरांपुढे होते. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी कोविडचे आव्हान पेलले. हे करत असताना कोणत्या सुविधांची गरज आहे, काय कमतरता आहे अशा अनेक उणीवा डॉक्टरांना जाणवल्या असे असतानाही डॉक्टरांच्या अखंड सेवेमुळेच कोविड महामारीवर विजय मिळवता आला असल्याचे आमदार अशोकराव चव्हाण यांनी यावेळी सांगितले. संगमनेरचे डॉ.सतीश वर्पे, यांच्यासोबत जिल्ह्यातील डॉ.अक्षय शिरसाठ, डॉ.ज्ञानेश्वर राहींज, डॉ.रवींद्र कवडे, डॉ.करणसिंग घुले, डॉ.सचिन कोरडे, डॉ.प्रकाश पवार, डॉ.स्वप्नील माने, डॉ.रमेश गोसावी, डॉ.संतोष झाडे, डॉ.मनोजकुमार कापसे, डॉ.सुधीर सुद्रिक यांचा यावेळी सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.