संगमनेर : काल शनिवारी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील गावागावात आणि तालुक्याच्या इतर ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गारपीट झाली, या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांच्या शेती पिकांचा तात्काळ पंचनामा होणे आवश्यक आहे, मात्र सध्या हे कर्मचारी संपावर आहेत. त्यामुळे तहसीलदार अमोल निकम यांनी नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे आवाहन तलाठी आणि कृषी सहाय्यकांना केले असून त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पंचनामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शनिवारी तालुक्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. या गारपिटेने शेतकऱ्यांची शेती पिके उध्वस्त झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होणे गरजेचे होते, मात्र सध्या जुनी पेन्शन मुद्द्यावर तलाठी,कृषी सहाय्यक यांचा संप सुरू आहे. त्यामुळे नुकसानीचे पंचनामे होण्याचा विषय संवेदनशील असल्याने तहसीलदार अमोल निकम यांनी शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पंचनामे करावेत म्हणून तलाठी आणि कृषी सहाय्यकांना आवाहन केले. त्यांच्या आवाहनाला संबंधित कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच हे पंचनामे सुरू होतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. कर्मचाऱ्यांच्या इतर कामाच्या बाबत त्यांचा संप सुरू राहणार आहे.