देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :
मंगळवार दि. 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास सुमारे दिड ते दोन तास झालेल्या मुसळधार पावसाने अवघा देवळाली प्रवरा परिसर जलमय झाल्याचे चित्र दिसत होते. देवळाली शहरात रस्त्यावरुन गुडघाभर पाणी वाहत असल्याने शहरासह इस्लामपूर, बाबुराव पाटील वसाहात, मातंगवस्ती परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांचे संसार भिजले.व अचानक आलेल्या मुसळधार पावसाने अवघे शहर जलमय झाल्याने सर्वत्र हाहाकार उडाला.87 मि.मी पाऊसाची नोंद झाली असुन देवळाली प्रवरा परीसरात एवढा मोठा पहिलाच पाऊस झाला आहे.
पहिल्यांदाच पित्रूपक्षात अशा प्रकारचा पाऊस झाला असल्याची चर्चा नागरिकातून ऐकण्यास मिळाली. अशा प्रकारचा पाऊस परिसरात पहिल्यांदाच झाला आहे. काल सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आकाशात काळ्याकुट्ट ढगांनी गर्दी केली व काही क्षणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सुमारे दिड ते दोन तास सुरु असलेल्या मुसळधार पावसाने वाड्यावस्त्यासह अवघा परिसर जलमय झाला. पाऊस उघडल्या नंतर अत्यंत भिषण परिस्थिती पाहायला मिळाली
पावसाने परिसरातील ओढ्यानाल्यांची पुर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पिकात पाणी शिरले. कपाशी, सोयाबिन, ऊस, मका, घास यासह सर्व पिकांत गुडघ्याच्यावर पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. प्रचंड पावसाने शहरातील रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते. प्रत्येक रस्त्यावरुन गुडघाभर पाणी वाहत होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्या तुंंबल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले. रस्ता कुठे व नाली कुठे हे समजत नसल्याने अनेक जण नालीत पडले. सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झाली नाही.
नाल्या तुंबल्याने शहरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्य व धान्य भिजले. खांदे गल्ली, शनिमंदिर चौक, काकासाहेब चौक, छत्रपती शिवाजी चौक, विश्वकर्मा चौक,राममंदिर चौक, बाजारतळ, नगरपरिषद कार्यालय, सोसायटी डेपो आदिसह सर्वत्र गल्लोगल्ली रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहात असल्याने अवघे शहर जलमय झाल्याचे द्रुष्य दिसत होते. इस्लामपूरा भागात रस्त्यावर साचलेले पाणी घरात घुसल्याने नागरिकांचे हाल झाले.
मुसळधार पावसाने हाहाकार उडून दिल्याने शेतशिवाराला तळ्याचे स्वरुप आल्याने सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. आधी झालेल्या पावसाने पिकात पाणी साचले होते. त्यात कालच्या पावसाने आणखी भर पडल्याने आता खरीपाची आशा संपूष्टात आली असून अशा प्रकारचा पाऊस पहिल्यांदाच पहिला असल्याची नागरिकात चर्चा ऐकण्यास मिळाली.