देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
जलजीवन मिशन कार्यक्रमा अंतर्गत नगर तालुक्यातील बु-हाणनगर सह 42 गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी 195 कोटी 74 लाख 97 हजार खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याची माहिती मा. राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
राहुरीतील मुळा धरणातुन थेट बु-हाणनगर 42 गावे पाणीपुरवठा योजनेकरीता महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा विभागाने दि. 26 जुलै 2022 रोजी तांत्रिक मान्यता दिली होती. या पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार तनपुरे यांनी जिल्ह्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद पाणी पुरवठा अधिका-यांची दि. 30 जुलै 2021 ते 18 जुन 2022 पर्यंत तब्बल 10 वेळा बैठका घेऊन या योजनेत येणा-या अडी अडचणींवर मात करत ही योजना सुरळीत कशी चालेल यादृष्टीने आराखडा तयार करण्यात आला होता. तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील व राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे मुंबई येथेही मंत्रालय स्तरावर वेळोवेळी बैठका घेऊन या योजनेसाठी पाठपुरावा केला होता. या योजनेत मतदार संघातील बहिरवाडी, धनगरवाडी, डोंगरगण, इमामपुर, मांजरसुंबा, ससेवाडी आदी गावांचा नव्याने आराखडा तयार करुन समावेश करण्यात आलेला आहे.
आमदार तनपुरे पुढे म्हणाले की, या योजनेतील मांजरसुंबा , डोंगरगण, पिंपळगांव माळवी, जेऊर, इमामपुर, शेंडी, पोखर्डी, धनगरवाडी, ससेवाडी, बहिरवाडी, पिंपळगांव उज्जैनी, आढाववाडी, वडगांव गुप्ता या गावांकरीता स्वतंत्र फिडर करण्यात आले आहे. या फिडरमुळे मोठ्या गावांना पाईप लाईनमुळे पुरेशा दाबाने पाणी पुरवठा होण्यास मदत होणार आहे. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघात कोट्यावधी रुपयांच्या अनेक पाणी पुरवठा योजना मार्गी लागल्या असुन काही ठिकाणी प्रत्यक्ष कामांना सुरवातही झाली असल्याचे त्यांनी सांगितले. मतदार संघातील रस्ते, वीज, पाणी या कामांसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगत जनतेच्या मुलभुत गरजांच्या कामांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले. बु-हाणनगर व 42 गावे पाणी पुरवठा योजना उत्कष्ठ प्रकारची नव्याने करुन पाणी प्रश्न मार्गी लावल्याने आमदार तनपुरे यांचे नगर तालुक्यातील लाभार्थी गावातील जनतेने आभार व्यक्त केले आहे.