सातारा; स्वामी सदानंद : संपूर्ण महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री यमाई देवी , कराडदेवी, ग्रामनिवासिनी श्री यमाईदेवी यांचा नवरात्रोत्सव कोरोनानंतर यंदा प्रथमच साजरा केला जात आहे.
त्यामुळे महाराष्ट्रासह परराज्यातील भाविक या सोहळयाचा लाभ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. सह्याद्रीच्या पर्वतरांगात निसर्गाच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक कलेचा वारसा लाभलेल्या सातारा जिल्ह्याच्या पूर्वेस असलेल्या औंधनगरीचा उल्लेख विविध कलाविष्कारांनी संपन्न नगरी म्हणून केला जातो. औंधनगरी इ. स. 1300 वर्षांपूर्वी चालुक्य घराण्यातील एका राजाने वसविली असे सांगितले जाते.
औंध गावच्या नैऋत्येस 1500 फूट उंचीची टेकडी आहे. त्या टेकडीवर श्री यमाईदेवीचे स्थान आहे. या शक्तीपीठास मुळपीठ म्हटले जाते, हे देवस्थान जागृत व स्वयंभू आहे. इ. स 1745 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर इ. स. 1745 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर इ. स. 1869 मध्ये श्रीनिवास परशुराम पंतप्रतिनिधी यांनी मंदिराच्या तटाचा जीर्णोद्धार केल्याचा शिलालेख आहे. डोंगराच्या पायथ्यापासून मंदिरापर्यंत जाण्यासाठी काळ्या पाषाणातील 432 पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला वाघ, सिंह, घोडे असे संगमरवरी पुतळे बसविले आहेत. मार्गावरील पुतळे भाविक पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनले आहेत. मुळपीठ डोंगरावर जाण्यासाठी रस्त्याची सोयही करण्यात आली आहे. डोंगरावरील यमाई मंदिर अतिप्राचीन भव्य, दगडी, कोरीव, कलाकृतीचा उत्तम नमुना आहे. मंदिराभोवती असलेल्या पाषाणयुक्त तटबंदीमध्ये दक्षिणोत्तर दोन अतिभव्य कोरीव महाद्वार आहेत. पूर्वेकडील बाजूस देवीच्या समोर एक कमान आहे. त्याठिकाणी दोन दगडी कोरीव फिरते खांब आहेत. तेथील खांब अतिशय दुर्मिळ कलाकृती आहे, हे खांब लहानमुले सुद्धा फिरवू शकतात.
तटबंदीच्या केंद्रस्थानी श्री यमाई देवीचे पवित्र सुंदर आकर्षक मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात जगदंबेची साडे सहा फूट उंचीची शांतमुख, आकर्षक तेजस्वी मूर्ती आहे. देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्याकडून देवीच्या महात्म्य वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातात. दरवर्षी पौष महिन्यात पौर्णिमेनंतर यात्रा भरवून उत्सव साजरा केला जातो. तर नवरात्रोत्सवानिमित मूळपीठ डोंगरावरील श्रीयमाईदेवी,ग्रामनिवासिनी श्रीयमाईदेवी, राजवाड्यातील कराडदेवी येथे नियमित विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये मंत्रपठन, मंत्रपुष्पांजली, महाआरती याबरोबरच कीर्तन व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
यंदाही नवरात्रोत्सवाची तयारी औंध येथे सुरू असून दहा दिवस धुमधडाक्यात नवरात्रोत्सव ग्रामनिवासिनी श्री यमाईदेवी मंदिरात साजरा केला जाणार आहे. औंधच्या नवरात्रोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे अष्टमी निमित्त मूळपीठ डोंगरावर देवीची यात्रा भरवली जाणार आहे. तसेच दसऱ्यानिमित्त औंध राजवाडयात शस्त्रपूजा, सिमोल्लंघन आदी कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.