सिन्नर : निळवंडे धरणाला माजी मंत्री मधुकरराव पिचड जलाशय असं नामकरण करण्यात यावे असा ठराव सिन्नर येथील सहवेदना शोकसभेत करण्यात आला . आदिवासी ह्रदयसम्राट माजी आदिवासी विकास मंत्री माजी विरोधी पक्षनेते निसर्गवासी मधुकररावजी पिचड साहेब यांना सिन्नर येथे सिन्नर तालुक्यातील सर्व पक्षीय व समविचारी संघटनांच्या वतीने सहवेदना शोकसभा घेऊन आदरांजली वाहण्यात आली. यावेळी निळवंडे धरणाला जलनायक माजी मंत्री मधुकरराव पिचड जलाशय असं नामकरण करण्यात यावे असा ठराव सर्वानुमते करण्यात आला.
या शोकसभाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळे होते . वंदनीय मधुकररावजी पिचड साहेब यांचा कार्यकाळ:- मधुकर पिचड यांचा जन्म १ जून १९४१ रोजी झाला होता. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर येथे त्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. त्यांचं शालेय शिक्षण त्यांच्या मूळगावी झालं. तर माध्यमिक शिक्षण संगमनेर येथे झाले. त्यांनी पदवीच्या शिक्षणासाठी पुण्यातील फर्क्युसन महाविद्यालयात प्रवेश केला. तेथे त्यांनी एलएलबीचे दोन वर्षे केले. येथेच त्यांचा राष्ट्र सेवा दलाशी संपर्क आला. त्यांनी महाविद्यालयीन निवडणुकांत सहभाग नोंदवला होता.
महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान ते थोर विचारवंत आणि स्वातंत्र्य सैनिक प्रा. ग. प्र. प्रधान यांच्या संपर्कात आले. त्यांना पुढे सामाजिक, राजकीय क्षेत्रात काम करावे म्हणून प्रोत्साहन मिळाले. त्यांच्याच प्रेरणेने नोकरीच्या फंदात न पडता सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. महाविद्यालयात असतानाच काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आदिवासी शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला. त्यांनी पहिला लढा १९६१ साली दिला.
पुढे त्यांनी सहकारी तत्त्वावर पहिली दूध संस्था राजूर येथे काढली. पहिल्या दिवशी २५ ते ३० लिटर दूध गोळा झाले. पुढे हाच धंदा तालुक्याचा प्रमुख व्यवसाय बनला. आज तालुक्यात २ लाख लिटर दूधाचे संकलन होत आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अपार मेहनत घेतली. आदिवासी उन्नती सेवा मंडळाची स्थापना करण्यात आली. याच संस्थेच्या अनेक आश्रमशाळा, माध्यमिक शाळा, वसतीगृहे आहेत. अकोले तालुक्यात जिल्हा परिषद सदस्य : १९७२ ला निवडून आले.
सभापती : १९७२ ते १९८० पर्यंत अकोले पंचायत समितीचे सभापती. सभापती असतांना १९७२ च्या दुष्काळात अहोरात्र काम केले. मेडिकल कॅम्पचे आयोजन, गाव तेथे रस्ता, तलाव या योजना राबविल्या.
विधानसभा सदस्य : १९८० ला विधानसभेवर निवडून गेले. आमदार झाले.
समितीवर निवड : १९८० ते १९८५ विधानसभा अनुसूचित जमाती कल्याण समिती प्रमुख म्हणून काम केले.
राज्यमंत्री : जून १९८५ ते १९८६
२७ जून १९८८ ते १२ मार्च १९९० कृषी, रोहयो, आदिवासी विकास, दुग्ध विकास, पशुसंवर्धन खात्याचे राज्यमंत्री
कॅबिनेट मंत्री : २८ जून १९९१ ते नोव्हेंबर १९९६ आदिवासी विकास, वन व पर्यावरण मंत्री याच दरम्यान मार्च १९९३ ते सप्टेंबर १९९४ आदिवासी विकास सहपशुसंवर्धन व दुग्ध, मत्स्य विकास मंत्री
सप्टेंबर १९९४ ते नोव्हेंबर १९९४ आदिवासी विकास,परिवहन व पूनर्वसन विकास मंत्री
राजीनामा : २४ नोव्हेंबर १९९४ रोजी गोवारी हत्याकांडाची नैतिक जबाबदारी स्वीकारून नागपूर अधिवेशनात मंत्रीपदाचा राजीनामा
संस्थापक अध्यक्ष : १९९३ मध्ये अगस्ति सह. साखर कारखान्याची स्थापना केली.
विधानसभा विरोधी पक्ष नेते : २५ मार्च १९९५ ते २५ जुलै १९९९ विधानसभा विरोधी पक्ष नेते म्हणून जबाबदारी यशस्वी पेलली. कॅबिनेट मंत्री : १९ ऑगस्ट १९९९ ते ऑगस्ट २००४ आदिवासी विकास, विशेष सहाय्य मंत्री
राष्ट्रीय कार्याध्यक्ष : आखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेवर ७ ऑक्टोबर २००१ रोजी निवड
प्रदेशाध्यक्ष : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड कॅबिनेट मंत्री : ११ जून २०१३ रोजी आदिवासी विकास मंत्री म्हणून निवड. समाजाच्या न्याय हक्क- अधिकारासाठी सातत्याने संघर्ष करत होते. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माजी आदिवासी विकास मंत्री निसर्गवासी मधुकररावजी पिचड साहेब यांचं ०६ डिसेंबर रोजी प्रदिर्घ आजाराने ८४ व्या वर्षी दुःखद निधन झालं.त्यांचा अंत्यविधी ०७ डिसेंबर ला अकोले तालुक्यातील राजूर या त्यांच्या गावी झाला.ते निसर्गात विलीन झाले.त्यांच्या अंत्यविधीला मोठा जनसागर उसळला होता.त्यांनी आदिवासींच्या विकासासाठी आदिवासींसाठी वेगळं बजेट, आदिवासी मध्ये बोगसांची घुसखोरी रोखण्यासाठी केलेला कायदा, आदिवासींच्या न्याय हक्कासाठी पेसा कायद्याची निर्मिती,आदिवासी विकास भवन, आदिवासींच्या शिक्षणासाठी आश्रमशाळांची निर्मिती, आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा व आदिवासी क्रांतिकारकांचा इतिहास पुढे आणण्याचं काम, भंडारदरा धरणाला आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचं नामकरण,शेतकऱ्यांसाठी निळवंडे धरणाची निर्मिती,अगस्ती सहकारी साखर कारखाना निर्माण करण्याचं काम असे अनेक कामं मधुकररावजी पिचड साहेब यांनी केले.त्यांच्या निसर्गात विलीन झाल्याने आदिवासी समाज पोरका झाला असा नेता पुन्हा होणे नाही.सर्व समाजाला समतेची वागणूक देणाऱ्या लोकनेता,जलनायकाला भावपूर्ण आदरांजली
यावेळी वेगवेगळ्या पक्षाच्या व समविचारी संघटनांच्या मान्यवरांनी वंदनीय निसर्गवासी मधुकररावजी पिचड साहेब यांना आदरांजली वाहिली. या सहवेदना शोकसभेचं सुत्रसंचलन विजय मुठे प्रास्थाविक रामु इदे तर आभार सिताराम मदगे यांनी मानले
यावेळी महामित्र दत्ता वायचळे, सामाजिक कार्यकर्ते डि.डि.गोरडे आण्णा,शिवसेना (उबाठा) चे माजी नगराध्यक्ष किरण डगळे, माजी नगरसेवक रुपेश मुठे,किरण कोथमिरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ( शरदचंद्र पवार) महाराष्ट्र सरचिटणीस राजाराम मुरकुटे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड हरिभाऊ तांबे,भीम आर्मी चे प्रकाश शिरसाट,सागर भालेराव सर, आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे निवृत्ती भांगरे,यमुनाताई भांगरे,रामु इदे, विजय मुठे, सिताराम मदगे,गंगारामभाऊ तळपाडे,सोनू मेंगाळ, नामदेव वाजे,भरत भांगरे, उत्तम भांगरे, संतोष बांगर, रंगनाथ कुंदे, रामदास कुंदे,ट्रायबल आर्मी चे अमोल गवारी, दत्तात्रय माळी,नवनाथ जाधव,गोरक्ष सावंत, अशोक घरटे आदी.उपस्थित होते.