मुंबई : महाविकास आघाडीच्या दारुण पराभवाचे विश्लेषण केले जात आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या तीन पक्षांना मिळून अवघ्या 36 जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे मविआमधील नेत्यांमध्ये नाराजी दिसत आहे
या पराभवावर बोलताना आणि नेत्यांमधील नाउमेदीवर शरद पवारांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, निवडणुकीत अप अन् डाऊन असतात पण नाउमेद व्हायचं नसतं. मी 14 निवडणुक लढलो आहे पण कधी पराभव पाहिला नाही. मात्र यावेळी राज्यात आम्हाला पराभव पाहायला मिळाला. पराभव झाला तर चिंता करायची नसते, लोकांच्या जायचे. लोक अस्वस्थ दिसत आहेत. निवडणूक झाल्यानंतर जे वातावरण असतं ते दिसत नाहीत.’
EVM वर संशय व्यक्त केला जात आहे. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, आमच्यासाठी अनुकूल वातावरण दिसत होते. मात्र खात्रीशीर माहिती हाती येत नाही तोपर्यंत त्यावर बोलणे योग्य नाही. हरियाणामध्ये भाजपची परिस्थिती बिकट दिसत होती त्यांनी तेथे विजय मिळवला. तर जम्मू कश्मिरमध्ये उमर अब्दुला यांचे सरकार आले तेथे काँग्रेसचा पराभव झाला. महाराष्ट्रात काय झाले तुम्ही पाहिले. झारखंडमध्ये मात्र आघाडी जिंकली. मोठी राज्य भाजप जिंकत आहे, असं दिसतंय, असे शरद पवार म्हणाले.
शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना पुन्हा लोकांमध्ये जाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच मतांची संख्या जास्त असताना जागा मात्र कमी मिळाल्या यावर मत व्यक्त केले.
ते म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 79 लाख मते आहेत तर 57 जागा आहेत. तर, काँग्रेसला 80 लाख मतं आणि 16 जागा आहेत. तर, शरद पवार गटाला 72 लाख मते आणि दहा जागा आहेत. अजित पवार गटाला 58 लाख मतं आणि 41 जागा आहेत. हे आश्चर्यकारक आहे. असं कॅलक्यूलेशन आहे, आम्ही याच्या खोलात गेलेलो नाही. जोपर्यंत आमच्याकडे आधार नाही, तोपर्यंत याच्यावर भाष्य करणे योग्य नाही.